'संसदीय लोकशाही ही बौद्ध संस्कृतीची देण'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नागपूर - संसदीय लोकशाही प्रणाली आपल्या देशात प्राचीन काळापासून आहे. बौद्ध भिक्‍खू संघ याचा उपयोग करीत होते. संघातर्फे राजकीय सभांसाठी या प्रणालीचा वापर केला जात होता, असे सांगून संसदीय लोकशाही प्रणाली बौद्ध संस्कृतीची देण असल्याचे वक्तव्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. 

नागपूर - संसदीय लोकशाही प्रणाली आपल्या देशात प्राचीन काळापासून आहे. बौद्ध भिक्‍खू संघ याचा उपयोग करीत होते. संघातर्फे राजकीय सभांसाठी या प्रणालीचा वापर केला जात होता, असे सांगून संसदीय लोकशाही प्रणाली बौद्ध संस्कृतीची देण असल्याचे वक्तव्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. 

ओगावा सोसायटीतर्फे कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात उभारण्यात आलेल्या विपश्‍यना मेडिटेशन सेंटरचे उद्‌घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते आज झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांची उपस्थिती होती. 

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, की बौद्ध काळात गणपूर्ती, मतगणना, निंदा प्रस्ताव सारखे नियम होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील भाषणातही याचा उल्लेख केला आहे. संविधानाच्या माध्यमातून ही परंपरा त्यांनी पुन्हा रुजविली. सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बुद्धांचा प्रभाव असल्याने संविधान बुद्धदर्शनाच्या आदर्शावर आधारित असल्याचे दिसून येते. भारतासह अनेक देशांत बुद्ध धम्म आहे. या देशातील सामाजिक आंदोलने ही बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने झाली. मागील अडीच हजार वर्षांपासून बुद्धांची शिकवण देशाला प्रेरणा देत आहे. त्यांची समानता, न्यायतत्त्व प्रेरक राहिली आहे. विपश्‍यना भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. ती मन आणि शरीराला शुद्ध करते. विपश्‍यनेचा अर्थ स्पष्ट पाहणे असा आहे. यामुळे विपश्‍यनेला एखाद्या विशिष्ट धर्माशी जोडणे योग्य नाही. ती मानवाच्या कल्याणासाठी आहे. 

सुलेखा कुंभारे यांनी विपश्‍यना मेडिटेशन सेंटरची माहिती देताना ही वास्तू उभारणाऱ्या कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उद्‌घाटनानंतर राष्ट्रपतींनी ड्रॅगन पॅलेसला भेट देऊन बुद्धवंदना केली. 

बुद्धांचे विचार प्रेरणादायी - गडकरी 
नितीन गडकरी म्हणाले, की गौतम बुद्धांचे सत्य, अहिंसा हे पंचशिलाचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे नागपूरला ऐतिहासिक महत्त्व आहेच. देशातून आणि परदेशातून दीक्षाभूमीवर भाविक येतात. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि मेडिटेशन सेंटर जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरेल. नागपुरातून अनेक देश विमानसेवेने जोडण्यात येणार आहेत, असे सांगतानाच नागपूर मेट्रो कामठी-कन्हानपर्यंत जोडण्याचा विचार असल्याचेही गडकरी म्हणाले. 

Web Title: nagpur news President Ramnath Kovind