राजकीय दबावामुळे पदोन्नतीचे आदेश केले रद्द? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नागपूर - अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढल्यानंतर १२ दिवसांत ते रद्द करण्याचा महापराक्रम महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने केला. त्यामुळे १२ ते २४ वर्षांपासून पदोन्नतीची प्रतीक्षा करीत असलेल्या कर्मचाऱ्यांत तीव्र संताप असून, सत्ताधारी पक्षातील एका नेत्याच्या दबावात आदेश रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. 

नागपूर - अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढल्यानंतर १२ दिवसांत ते रद्द करण्याचा महापराक्रम महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने केला. त्यामुळे १२ ते २४ वर्षांपासून पदोन्नतीची प्रतीक्षा करीत असलेल्या कर्मचाऱ्यांत तीव्र संताप असून, सत्ताधारी पक्षातील एका नेत्याच्या दबावात आदेश रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. 

राज्य शासनाने महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा आकृतिबंध मंजूर केला. त्यानुसार अग्निशमन विभागातील काही पदे पदोन्नतीने भरण्यात येत आहेत. ऑक्‍टोबरमध्ये मनपा विभागीय पदोन्नती समितीने अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक व चालक, यंत्रचालक यांना प्रमुख अग्निशमन विमोचक या रिक्तपदावर पदोन्नती देण्याची शिफारस केली होती. या शिफारशीनुसार महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने अग्निशमन विभागातील २२ जणांना प्रमुख अग्निशमन विमोचकपदी पदोन्नती दिली. या पदोन्नतीचे आदेश १२ ऑक्‍टोबर रोजी काढण्यात आले. परंतु, या २२ जणांच्या यादीत महापालिकेतील एका नेत्याच्या जवळच्या व्यक्‍तीचे नाव नसल्याने ही संपूर्ण पदोन्नती रद्द करण्यात आली. पदोन्नती रद्द करण्याचे आदेश २४ ऑक्‍टोबर रोजी काढण्यात आले. पदोन्नती का रद्द केली, याबाबत कुठलेही कारण सामान्य  प्रशासन विभागाने दिले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे पदोन्नतीची प्रतीक्षा करीत असलेल्यांना धक्का बसला असून, संतापाची लाट उसळली आहे. यानिमित्त सत्ताधाऱ्यांच्या तालावर सामान्य प्रशासन विभाग ठेका धरत असल्याचेही अधोरेखित झाले. अग्निशमन विभाग तोकड्या मनुष्यबळाने संघर्ष करीत आहे. त्यातच सामान्य प्रशासन विभागाच्या पदोन्नती रद्दच्या आदेशाने  या कर्मचाऱ्यांत नैराश्‍य पसरले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याकरिता पदोन्नतीचे आदेश काढल्याचे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात येत आहे. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यायची होती, तर आधीच याबाबत विचार का केला गेला नाही? असा सवाल उपस्थित करीत  कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

क्षणिक ठरला पदोन्नतीचा आनंद  
सामान्य प्रशासन विभागाने १२ ऑक्‍टोबर रोजी पदोन्नतीचे आदेश काढले असले तरी दिवाळीपूर्वी अर्थात १८ ऑक्‍टोबर रोजी पदोन्नतीबाबत कर्मचाऱ्यांना पत्र मिळाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. मात्र, दिवाळी झाल्यानंतर २४ ऑक्‍टोबरला पदोन्नती रद्दचे आदेश काढून सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या दिवाळी आनंदावर पाणी फेरले. 

सत्ताधाऱ्यांतच मतभेद 
अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती देण्याबाबत अग्निशमन विशेष समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी महापौर नंदा जिचकार यांना पदोन्नती रद्द करण्याचे आदेश निघाले त्याच दिवशी, २४ ऑक्‍टोबर रोजी पत्र दिले. दुसरीकडे मनपातील सत्ताधारी नेत्याच्याच दबावात पदोन्नतीचे आदेश रद्द करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांतच यावरून  मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: nagpur news Promotions order canceled due to political pressure