नासुप्रने सुरू केले मालमत्तेचे मोजमाप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पालिकेकडे हस्तांतरण प्रक्रियेला प्रारंभ - प्रस्ताव पाठविणार

नागपूर - नागपूर सुधार प्रन्यासने महापालिकेला मालमत्ता हस्तांतरणासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारपासून मालमत्तांची यादी तयार करण्यास प्रारंभ होणार आहे. नासुप्रकडे अनेक उद्याने व मोकळी मैदाने आहेत. या उद्यानांचा देखभालीचा खर्च झेपणार की नाही याबाबतचा अंदाज घेतल्यानंतर महापालिका ते ताब्यात घेणार आहे. मालमत्तांसोबतच नासुप्रचे अधिकारी, कर्मचारी प्रतिनियुक्तीवर येणार काय? आदी प्रश्‍नांचाही खुलासा झाल्यानंतर हस्तांतरणास अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे सूत्राने नमूद केले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीसाठी राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली. आता ‘काउंटडाउन’ही सुरू झाले आहे. मालमत्ता हस्तांतरणाबाबत शनिवारी नासुप्र व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक नासुप्र कार्यालयात झाली. बैठकीत महापालिकेला हस्तांतरण करावयाच्या मालत्तांची यादी तयार करण्यावर खल झाला. चार ते पाच दिवसांत नासुप्र मालमत्तांची यादी तयार करणार आहे. परंतु, नासुप्रच्या अनेक मालमत्तांच्या देखभालीचा खर्च मोठा असल्याने महापालिकेपुढे नवे आव्हान उभे राहणार आहे.

महापालिकेकडे सध्या असलेले मनुष्यबळ तोकडे आहे. अशा स्थितीत महापालिकेने नासुप्रची मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर तेथील अधिकारी व कर्मचारीही प्रतिनियुक्तीवर येणार काय? गुंठेवारीचा परिसर ताब्यात घेताना त्या परिसरातील रस्ते, पथदिव्यांसह नागरिकांना विविध सुविधा महापालिका देणार काय? 

नासुप्रने सुरू केले मालमत्तेचे मोजमाप
असे अनेक प्रश्‍न आहे. नासुप्रची मालमत्ता ताब्यात घेताना उत्पन्नाची साधने व येणारा खर्च याचाही ताळमेळ महापालिकेला बसवावा लागणार आहे.

नासुप्रचे समाजभवन, मोकळी मैदाने, उद्याने सुस्थितीत असून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीची  कामेही चांगली आहे. महापालिकेबाबत चित्र मात्र उलटे आहे. अनेक उद्यानांची दुर्दशा असून, मोकळ्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नासुप्रसाठी हस्तांतरणाची प्रक्रिया सोपी असली तरी महापालिकेपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

चर्चेनंतर अंतिम निर्णय
नासुप्रने मालमत्तांची यादी तयार केल्यानंतर महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक होणार आहे. बैठकीत मालमत्ता हस्तांतरणाबाबत अंतिम निर्णय होईल. त्यानंतर राज्य शासनाकडे हस्तांतरण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला जाईल, असे सूत्राने सांगितले.

Web Title: nagpur news property counting by nasupra