अकेले हैं, तो क्‍या गम हैं...!

अकेले हैं, तो क्‍या गम हैं...!

नागपूर - ना आई... ना बाप... ना भाऊ ना बहीण ...ना बायको ना लेकरू... रक्ताचे असे कोणीच नाही. यामुळेच त्याच्या डोक्‍यात फरक पडला असावा. अवास्तव बडबड सुरू झाल्याने त्याला मनोरुग्णालयात येणे भाग पडले. खिशात तिकिटांसाठी पैसे नाही. परंतु, याची तमा न बाळगता सात तास सायकलचा प्रवास करून तो मनोरुग्णालयात दाखल झाला खरा; परंतु तपासण्याची वेळ निघून गेली. यामुळे औषधापासून वंचित राहिला. अंगावर मळकट कपडे घातलेला हा मनोरुग्ण औषधासाठी थेट वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात धडकला. आपली व्यथा सांगितली. पन्नास रुपयांच्या औषधासाठी दीडशे किलोमीटर सायकलवर प्रवास करणाऱ्या मनोरुग्णाला दोन तासांच्या भटकंतीनंतर अधीक्षकांच्या मध्यस्थीने औषध मिळाले. त्या मनोरुग्णाचे नाव अरुण वानखेडे. तो मूळचा चंद्रपूरचा.    

सहा महिन्यांपूर्वी मानसिक त्रास होत असल्याचे जाणवले. तो मनोरुग्णालयात आहे. तपासणी झाली. मिळालेल्या औषधोपचारातून काही प्रमाणात बरा झाला. औषधं संपल्याने पुन्हा बडबड सुरू झाली. मनोरुग्णालयात येण्यासाठी पैसे नाहीत. ज्या ठिकाणी हाताला काम मिळाले त्याच ठिकाणी जेवण मिळेल, हा विश्‍वास बाळगून अरुण गेल्या २५ वर्षांपासून आयुष्य जगत आहे. कविमनाच्या अरुणला रक्ताचे कोणी नातेवाईक नसले  तरी रस्त्यावरचे आयुष्य जगणारी सारीच माणसे आपले नातेवाईक असल्याचे तो सांगतो. ‘अकेले हैं... तो क्‍या गम हैं...’ हे गाणे गुणगुणत असताना त्याचा जीव तहानेने व्याकुळ झाल्याचे दिसत होते. भुकेने पोट पाटीला लागले होते; परंतु भुकेपेक्षा औषधासाठी अरुणची सारखी धडपड सुरू होती. मनोरुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद झाल्यामुळे अरुणची तक्रार कोणीही ऐकून घेत नव्हते. औषध मिळणार नाही, हे कळून चुकल्यानंतर मात्र त्याचा जीव कासाविस झाला. दोघांच्या अंगावर धावून गेला. तर साहेब कुठे आहेत, असे विचारीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांच्या समोर दाखल होत औषध द्या, असे म्हणत, त्याने आपल्या आयुष्याची कथा सांगून टाकली. सात तासांच्या यातना सहन करत आलेल्या मनोरुग्णाला औषधाशिवाय परत पाठवणार काय? हा सवाल केल्यानंतर मात्र असह्य अरुणला मदत करण्यासाठी डॉ. नवखरे पुढे आले. कर्तव्य समजून त्याला मदत केली. औषध मिळाल्यानंतर अरुणने मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सलाम करीत सायकलवरून चंद्रपूरकडे कूच केले. 

मनोरुग्णालयात कॅज्युल्टी नाही. सकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू होतो. दुपारी बंद झाल्यानंतर सारे डॉक्‍टर निघून जातात. यामुळे मनोरुणाला औषध उपलब्ध करून देता येत नाही. अरुण वानखेडे यांना चंद्रपूरवरून येथे यायची गरज नव्हती. चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात ही औषधं मिळतात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानसिक विकारावर उपचारासाठी डॉक्‍टर उपलब्ध आहेत. 
-डॉ. प्रवीण नवखरे, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com