फूटपाथवर बांधण्याचे प्रकरण भोवणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागपूर - नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागासमोरच्या फूटपाथवर उपचारासाठी आणलेल्या मनोरुग्ण महिलेस बांधून ठेवण्यात आल्याची बाब ‘सकाळ’ने उघडकीस आणली. याची दखल राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली. मनोरुग्णांना रस्त्याच्या फूटपाथवर बांधण्याचे प्रकरण गंभीर असून चौकशी केली जाईल. दोषींवर निश्‍चित कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. 

नागपूर - नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागासमोरच्या फूटपाथवर उपचारासाठी आणलेल्या मनोरुग्ण महिलेस बांधून ठेवण्यात आल्याची बाब ‘सकाळ’ने उघडकीस आणली. याची दखल राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली. मनोरुग्णांना रस्त्याच्या फूटपाथवर बांधण्याचे प्रकरण गंभीर असून चौकशी केली जाईल. दोषींवर निश्‍चित कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. 

मेळघाट दौऱ्यानिमित्त नागपूर विमानतळावर आले असता, त्यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या व्हॉट्‌सॲपवर मनोरुग्णाला बांधून ठेवण्यात आलेले छायाचित्र बघितले. यानंतर साधलेल्या संवादात त्यांनी उपचारादरम्यान मनोरुग्णांवर अत्याचार करू नयेत, त्यांना अशाप्रकारे रस्त्यावर बांधून ठेवू नये, अशा अत्याचार प्रतिबंधक तरतुदींचे पालन करण्याच्या सूचना कायद्यात असतानाही मनोरुग्णालयातील परिचारिका, अटेंडंट यांनी अशाप्रकारचे कृत्य केले. ही बाब निंदनीय असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. सावंत म्हणाले. 

मनोरुग्ण महिलेला फूटपाथवर ठेवले बांधून

मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या महिलेला मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासमोर असलेल्या फुटपाथवर साडेदहा वाजतापासून अडीच वाजेपर्यंत बांधून ठेवले. साडेदहा ते अडीच अशी चार तास ही मनोरुग्ण महिला उपाशी होती. तहानेने व्याकुळ झाली होती. जेवणही मिळाले नाही. अशाप्रकारे मनोरुग्ण महिलेचा छळ मनोरुग्णालयातील परिचारिका, अटेंडंट्‌सच्या या अघोरी कृत्यातून झाला. डॉ. सावंत यांनी आरोग्य उपसंचालक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली. 

प्रादेशिक मनोरुग्णालयावर पुन्हा बैठकीचे गाजर
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रश्नावर मुख्य सचिवांकडे बैठक लावून मार्ग काढणार असल्याचे नागपुरात सांगितले होते. परंतु, मुंबईत मुख्य सचिवांविनाच झालेल्या बैठकीत गेल्या अडीच वर्षांच्या काळात येथे पूर्णवेळ अधीक्षक नसणे, गेल्या सहा महिन्यांत येथे २ संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालात मृत्यू झालेल्याला मारहाणीच्या खुना असल्यावरही कुणावर कारवाई न होणे, गेल्या सात वर्षांत १२५ मृत्यू, सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचा
विषय पुन्हा पुढे आला. आता पुन्हा पालकमंत्र्याकडून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत मुख्य सचिवांकडे बैठक लावण्याचे गाजर दाखवण्यात आले.

मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार
 मनोरुग्ण महिलेस सांभाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण असलेले कर्मचारी असतात. याउपरही कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करून मनोरुग्ण महिलेस फूटपाथवर बांधून ठेवले. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून या प्रकरणाची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येईल, असे सिव्हिल ह्युमन राइट प्रोटेक्‍शन असोसिएशनतर्फे कळविण्यात आले. 

Web Title: nagpur news psychotic woman