शेवटच्या दिवशी पोलिस भरतीत राडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नागपूर - नागपूर शहर पोलिस आयुक्‍तालयातर्फे सुरू असलेल्या पोलिस भरतीप्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी ‘राडा’ झाला. प्रवेशपत्र दिल्यानंतर मंगळवारी शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. मैदानावर पोहोचल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी भरतीप्रक्रिया एक दिवस पूर्वीच संपल्याचे उमेदवारांना सांगितले. त्यामुळे उमेदवारांनी गोंधळ घालत भरतीप्रक्रियेस विरोध दर्शविला.

नागपूर पोलिस आयुक्‍तालयात पोलिस शिपायी पदाच्या एकूण २१० जागेची भरतीप्रक्रिया सुरू आहे. या भरतीप्रक्रियेत ३३ हजार ९०६ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यामध्ये २५ हजार ४२६ पुरुष उमेदवार, तर सात हजार ७८९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. ९ मार्चपासून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीप्रक्रियेस प्रारंभ झाला.

सुरुवातीला पुरुष उमेदवारांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर महिला उमेदवारांना बोलाविले. लांब उडी, गोळाफेक, पुलअप्स, रनिंग यासह छाती-उंची मोजण्याची प्रक्रिया पाडल्या गेली. मात्र, तांत्रिक चुकांमुळे किंवा कोणत्याही कारणांमुळे प्रवेशपत्र न मिळालेल्या तसेच त्रुटी  दूर केलेल्या उमेदवारांना २७ मार्च रोजी पोलिस मैदानावर मैदानी चाचणीसाठी बोलाविले होते.

मंगळवारी तरुण-तरुणी पोलिस मैदानावर उपस्थित झाले. त्यावेळी मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी भरतीप्रक्रिया सोमवारीच बंद झाल्याचे कळविले. मात्र, विद्यार्थ्यांनी मंगळवार चाचणी असल्याचे प्रवेशपत्र दाखवले. त्यानंतरही पोलिसांनी त्यांची चाचणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी नाराजी व्यक्‍त केल्यानंतर पोलिस आयुक्‍तालय गाठून आयुक्‍तांकडे गाऱ्हाणे मांडल्याची माहिती आहे. भरती प्रक्रियेच्या इंचार्ज पोलिस उपायुक्‍त श्‍वेता खेडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पोलिसांच्या प्रवेशपत्रानुसार पहाटे पाच वाजता आम्ही मैदानावर हजर झालो. मात्र, अधिकाऱ्यांनी भरती घेण्यास मनाई करीत वृत्तपत्रात जाहिरात देऊन शारीरिक चाचणी संपल्याचे घोषित केल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही सर्वांनी अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या. त्यानंतर मुलींची चाचणी घेतली, तर मुलांना परत पाठविले.
- योगिता, उमेदवार.

Web Title: nagpur news Rada in the police recruitment on the last day