रेडिओलॉजिस्ट उपलब्ध, पण नाहीत सोनोग्राफी यंत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

दोन वर्षांपासून प्रशासन पत्रव्यवहार करून सोनोग्राफी यंत्रासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. तोपर्यंत रुग्णांच्या सोयीसाठीच ‘आउट सोर्सिंग’ करण्यात येईल. रुग्णांना त्रास होऊ नये हा यामागचा उद्देश आहे.  
- डॉ. मीना देशमुख,  वैद्यकीय अधीक्षक कामगार, रुग्णालय.

नागपूर - उद्योग, कारखान्यांमधील असंघटित श्रमिकांच्या शारीरिक वेदनांवर फुंकर घालण्यासाठी राज्य कामगार विमा रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र, येथील अपुऱ्या आणि कालबाह्य साधन सुविधा उपचार तर दूरच रुग्णांच्या जिवावर उठतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी पेठेतील सोनोग्राफी यंत्र तीन वर्षांपूर्वी कालबाह्य झाले. पण, तरीसुद्धा ते बदलून देण्यास राज्य सरकार तयार नाही. यामुळे सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांना खासगीचा रस्ता दाखवला जातो. सोनोग्राफीचे आउट सोर्सिंगमधून रुग्णालयाला दरमहा साडेतीन लाख  रुपयांचा फटका बसतो, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

सोमवारी पेठेतील कामगार विमा रुग्णालयात ३५ वर्षांपासून रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक सोनोग्राफी मशीन होती. या मशीनवरच महिला व पुरुष कामगार रुग्णांवर सोनोग्राफी निदान  व्हायचे. एकच सोनोग्राफी यंत्र सुरू होते. हजारो, लाखो रुग्णांचे याच मशीनवर उपचार झाले. तीन वर्षांपूर्वी मात्र या मशीनची मुदत संपली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने राज्य शासनाकडे नवीन सोनोग्राफी मशीन मंजूर करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला. मात्र, त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या. राज्य शासन नवीन मशीन मंजूर करीत नसल्याचे पाहून प्रशासनाने कालबाह्य मशीनवरच वर्षभर रुग्णांवर उपचार केले. आता मशीन पूर्णत: बंद पडली. 

रुग्णांची सोनोग्राफी  कशी करायची? असा प्रश्न प्रशासनाला पडला. त्यानंतर रुग्णांसाठी प्रशासनाने आउट सोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला. शहरातील तीन रुग्णालयांशी आउट सोर्सिंगचा करार करण्यात आला. यामुळे दरमहा साडेतीन लाख रुपयांचा फटका बसतो. विशेष असे की, कामगारांच्या वेतनातून कपात केलेला हा निधी आहे. संबंधित रुग्णालयात रुग्णांनी घेतलेले उपचार पाहून विमा रुग्णालय प्रशासन दर महिन्याला संबंधित रुग्णालयाचे महिन्याचे बिल अदा करते. 

Web Title: nagpur news Radiologist Sonography