अपहरण करून राहुलला जाळले?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

नागपूर - एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी लॉटरी व्यापारी सुरेश आग्रेकर यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून, अद्याप राहुलचा ठावठिकाणा पोलिसांना  सापडलेला नाही. दरम्यान, बुटीबोरी येथे एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडला असून तो राहुलचाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आग्रेकर कुटुंबीयांनी तो राहुलचा मृतदेह नसल्याचे सांगितले. त्यामुळे मृतदेह कुणाचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अपहरण  करणारे आरोपी दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे यांच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण ताकद लावली आहे. 

नागपूर - एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी लॉटरी व्यापारी सुरेश आग्रेकर यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून, अद्याप राहुलचा ठावठिकाणा पोलिसांना  सापडलेला नाही. दरम्यान, बुटीबोरी येथे एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडला असून तो राहुलचाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आग्रेकर कुटुंबीयांनी तो राहुलचा मृतदेह नसल्याचे सांगितले. त्यामुळे मृतदेह कुणाचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अपहरण  करणारे आरोपी दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे यांच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण ताकद लावली आहे. 

मंगळवारी सकाळी सेंट्रल एव्हेन्यू येथील दारोडकर चौकातून ३२ वर्षीय राहुलचे अपहरण  करण्यात आले होते. राहुल सकाळी साडेआठ वाजता एक ते दीड तासात परत येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. तो घरून पायीच निघाला होता. काही दूर अंतरावर दारोडकर चौकात दुर्गेश आणि पंकज बोलेरो गाडीत त्याची वाट पाहात होते. राहुल त्यांच्यासोबत गाडीत बसून रवाना  झाला होता. सकाळी ११.३० वाजता त्याने पत्नी अर्पिताला फोन करून एक ते दीड तासात परत येतो असे सांगितले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास राहुलच्या मोबाईलवरून त्याचा मोठा भाऊ जयेश यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी फोन आला. तेव्हा राहुलचे अपहरण  झाल्याचे कुटुंबीयांना कळले. 

खंडणीच्या फोनने घाबरलेल्या राहुलच्या कुटुंबीयांनी दुपारी चार वाजता लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांना राहुलच्या मोबाईलवरून पुन्हा खंडणीसाठी फोन आला. लकडगंज पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. रात्री ७ वाजता अपहरणकर्त्यांनी तिसऱ्यांदा फोन केला होता. त्यांनी एक कोटी रुपये घेऊन कोराडीतील जगदंबा मंदिराजवळ येण्यास सांगितले. रात्री ११ वाजता पुन्हा फोन करू असे सांगून मोबाईल बंद केला होता. तेव्हापासून राहुलचा मोबाईल बंदच आहे. दरम्यान, दुपारी चार वाजताच्या सुमारास  बुटीबोरी येथील पेटीचुहा येथील रामा डॅमजवळ एका युवकाचा मृतदेह आढळला. रस्त्याने जात असलेल्या मजुरांनी जळत असलेला मृतदेह पाहून बुटीबोरी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह मेडिकलला पाठवला होता.

चाव्या, पर्स, जिन्स राहुलच्या 
पोलिसांना इलेक्‍ट्रॉनिक्‍स सर्व्हिलन्सद्वारे पंकज, आरोपी दुर्गेश आणि प्रशांत हे दुपारी जवळपास सव्वादोन वाजता बुटीबोरीमध्ये असल्याची माहिती मिळाली. या आधारावर शहर पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांशी संपर्क साधला. हा मृतदेह राहुलचा असल्याचा असण्याची शक्‍यता लक्षात घेता पोलिस राहुलच्या लॉटरी कार्यालयातील कर्मचारी व मित्रांना घेऊन मेडिकलमध्ये पोहोचले. मृतदेहाजवळ सापडलेला चाव्याचा गुच्छा, बेल्ट, पर्स, ब्रांडेड जिन्सच्या आधारावर मृतदेह राहुलचा असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी आग्रेकर कुटुंबीयांना मेडिकलमध्ये बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यास सांगितले. परंतु, त्यांनी मृतदेह राहुलचा नसल्याचे सांगितले. मृतदेहाची व राहुलची शरीरयष्टीत फरक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

दिशाभूल करण्याचा प्रयत्न 
मृतदेहाच्या खिशात असलेली पर्स आणि चावीचा गुच्छा राहुलचा आहे. जिन्सपॅंटसुद्धा राहुल घालतो तशीच आहे. यामुळे आरोपीनी दिशाभूल करण्यासाठी त्याचे साहित्य मृतदेहाजवळ फेकले असल्याची शंका राहुलच्या कुटुंबीयांनी व्यक्‍त केली आहे. यामुळे पोलिसही संभ्रमात पडले आहेत. आता हा मृतदेह कुणाचा, याचे मारेकरी कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

डीएनए तपासणी होणार  
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला रवाना झाले आहे. परिस्थितीवरून मृतदेह राहुलचा असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, कुटुंबीय यास तयार नसल्याने मृतदेहाची डीएनए तपासणी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Web Title: nagpur news rahul agrekar