पंकज कोठडीत, दुर्गेशने गाठले अमृतसर

पंकज कोठडीत, दुर्गेशने गाठले अमृतसर

नागपूर - संपूर्ण शहरात चर्चित लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी पंकज हारोडेला पोलिसांनी पश्‍चिम बंगालमधील कोलकाता शहरातून अटक केली. मात्र, पोलिस हॉटेलमध्ये पोहोचल्याची खबर लीक होताच दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे हा फरार झाला. तो अमृतरसमध्ये असल्याची खबर आहे. पंकजला आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

लॉटरी व्यवसायी राहुल आग्रेकर याचे पंकज हारोडे आणि दुर्गेश बोकडे या दोघांनी दारोकार चौकातून कारने अपहरण केले होते. एक कोटीची खंडणी मागितली होती. त्यापूर्वीच राहुलचा खून करून त्याला पेटीचुहा परिसरात पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आले होते. त्यानंतर पंकज आणि दुर्गेश यांनी बोलेरोने नागपुरातून पळ काढला. मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड  आणि पश्‍चिम बंगाल असा प्रवास आरोपींनी केला. दोघेही पश्‍चिम बंगालमधील हावडा शहरातील एका हॉटेलमध्ये लपून बसले असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. सापळा रचून पंकजला अटक केली. मात्र मुख्य आरोपी दुर्गेश हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.

फोनमुळे पंकज अडकला 
दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे यांनी हत्याकांडानंतर नागपुरातून पळ काढला. सर्वप्रथम नरसिंगपूर-मध्य प्रदेशातील नातेवाइकाकडे त्यांनी एक दिवस घालवला. नागपूर पोलिसांचे कनेक्‍शन पाहता दोन्ही आरोपींनी पश्‍चिम बंगाल गाठले. तेथे एका हॉटेलमध्ये दोन्ही आरोपी लपले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत आरोपींकडील सर्व पैसे संपले. त्यामुळे पैशाची गरज भासू लागल्याने पंकजने नागपुरात राहणाऱ्या साळ्याला फोन केला. पैसे संपल्याचे सांगून पैशाची मागणी केली. तसेच पत्नीशी बोलण्याचा आग्रह धरला. त्या फोन कॉलचा धागा पकडून सायबर क्राइमने आरोपींचा शोध लावला. 

अशी केली पैशाची व्यवस्था
दुर्गेश आणि पंकजकडील पैसे संपल्यानंतर ते नरसिंगपूरमध्ये जॅकी नावाच्या मावसभावाकडे थांबले. जॅकी हा पंकजच्या वीटभट्टीवरसुद्धा काम करीत होता. पंकजने जॅकीच्या एका मित्राच्या खात्यात नागपुरातून एका मित्राला २० हजार रुपये टाकण्यास सांगितले. नरसिंगपूरमध्ये एटीएममधून पैसे काढल्यानंतर ते कोलकात्याला गेले. दुर्गेशने ट्रॅव्हल्स एजंटला पटवून बॅंक खाते क्रमांक मिळवला. त्याच्या खात्यात एका मित्राने १० हजार रुपये टाकले. यातून त्यांनी ५०० रुपये ट्रॅव्हल्स एजंटला दिल्याची माहिती आहे.

पंकजच्या मावसभावाकडून पिस्तूल जप्त 
पंकजचा मावसभाऊ जॅकी नरसिंगपूरमध्ये राहतो. राहुलचा खून केल्यानंतर ते जॅकीच्या घरी गेले. जॅकीला पिस्तूल आणि बुलेट दिल्या. ते फेकून देण्यास सांगितले. मात्र जॅकीने पिस्तूल घरातच लपवून ठेवले होते. ते पोलिसांनी जप्त करून जॅकीला अटक केली. राहुलच्या हत्याकांडात जॅकीसुद्धा आरोपी असून त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी दोन्ही आरोपींना मदत केली आहे.

फेसबुकवर फोटोला केले ‘लाइक’
दुर्गेशने फेसबुकवरून नागपुरातील एका मित्राच्या फोटोला लाइक केले. त्याने याची माहिती पोलिसांना फोनवरून दिली. त्याला फेसबुकवर आणखी एखादा फोटो टाकून गुंतवून ठेवण्याची सूचना केली होती. दरम्यान, सायबर क्राइमच्या मदतीने टॉवर लोकेशनची माहिती काढली. त्यानंतर दुर्गेशच्या मागावर पोलिस लागले.

राहुलला घालणार होते गोळी
दुर्गेश आणि पंकजने महिनाभरापासून राहुलच्या अपहरणाचे नियोजन आखले होते. त्यात एक कोटी खंडणीची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास गोळी मारण्याचा समावेश होता. राहुलला कारमध्ये दुर्गेशने जोरदार ठोसे मारले. तसेच त्याच्या डोक्‍यावर पिस्तुलाचा बट मारला होता. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. तो मृत पावल्याचे समजून अंगावर पेट्रोल टाकून जिवंतच जाळले, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com