रेल्वेखाली येऊनही ‘तो’ बचावला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागपूर - जयपूर - मैसूर एक्‍स्प्रेस फलाटावर विसावत असतानाच एकाचवेळी अनेक प्रवाशांच्या तडून किंचाळ्या फुटल्या. चालकानेही प्रसंगावधान राखत करकचून ब्रेक लावला. इंजिनखाली प्रवासी आल्याचे सर्वजण सांगत होते. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि कुलींनी तातडीने इंजिनखाली शोध घेतला असता प्रवासी सुखरूप होता. प्रयत्नपूर्वक त्याला बाहेर काढण्यात आले. नागपूर स्थानकावरील गुरुवारी दुपारची ही घटना अनेक प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकविणारी ठरली. 

तरुण कुमार दास (४१) असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो ओडिशातील बालीधोटा येथील रहिवासी आहे. दुपारी २ वाजताच्या सुमारास जयपूर - मैसूर एक्‍स्प्रेस फलाट क्रमांक २ वर पोहचत असल्याने प्रवाशांची लगबग सुरू होती. अचानक तरुण रुळावर आडवा झाला.  इंजिन त्याच्यावरून गेले. हे चित्र उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या अनेक प्रवाशांच्या तोंडून किंचाळ्या बाहेर पडल्या. यामुळे चालकाने तिथेच ट्रेन थांबविली. बराचसा भाग तरुणाच्या अंगावरून गेला. सर्वांची पावले इंजिनाच्या दिशेने धावली. प्रवासी इंजिनखाली असल्याचे सर्वच सांगत असतानाच त्याचे काय झाले असेल, या विचाराने सर्वांच्या हृदयात धस्स झाले. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहायक उपनिरीक्षक बी. स. बघेल, जवान राजू खोब्रागडे, कुली नवसेर खान आणि सोनू गायकवाड यांनी इंजिनाखाली बघितले असता प्रवासी सुखरूप असला तरी पूर्णत: इंजिनखाली अडकला होता. इंजिन जागेवरून हटविणे धोकादायक असल्याने इंजिन तिथेच थांबवून परिश्रमपूर्वक त्याला बाहेर काढण्यात आले. तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्‍याबाहेर असला तरी हात फ्रॅक्‍चर असून डोक्‍याला दुखापत झाल्याने निदान करण्यात आले.

अपघात की आत्महत्येचा प्रयत्न?
इंजिनखाली आलेल्या तरुण दास याच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट आढळून आले आहे. त्यावर दुपारी १.२६ ही वेळ नमूद आहे. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार तरुण दीड वाजतापासूनच फलाटावर उभा होता. तणावग्रस्त आणि विचारमग्न असल्याचे जाधवत होते. जयपूर - मैसूर एक्‍स्प्रेस फलाटावर येत असताना तो अचानक रुळांवर आला. मात्र, त्याने उडी घेतली की अपघाताने पडला. हे अद्याप अस्पष्ट आहे. यामुळे हा अपघात की आत्महत्येचा प्रयत्न या प्रश्‍नाचे गूढ कायम आहे. आत्महत्या करायचीच असेल तरी ओडिसाचा व्यक्ती नागपुरात का येईल, असा प्रश्‍न सुरक्षा यंत्रणांना पडला आहे. घटनेपासूनच तरुणाने मौन बाळगले आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रतिसाद देत नव्हता. तो बोलल्यानंतरच नेमका प्रकार पुढे येईल.

Web Title: nagpur news railway