जोरदार पावसाची शक्‍यता कमीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नागपूर - जवळपास दोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता असल्यामुळे विदर्भातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतित आहे. पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी, त्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. कारण विदर्भात सध्या जोरदार पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे नागपूर वेधशाळेतर्फे सांगण्यात आले आहे. 

भारतीय हवामान विभागाने यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने विदर्भासह देशभरातील बळीराजा आनंदात होता. मात्र, त्यांचे भाकीत काही प्रमाणात खोटे ठरल्याने शेतकऱ्यांचा एकूणच भ्रमनिरास झाला. विदर्भात आतापर्यंत सरासरीच्या ५० टक्‍केही (३९९ मिलिमीटर) पाऊस पडला नाही. जून आणि जुलै हे दमदार पावसाचे दोन महिने निघून गेले असून, केवळ दोन महिने शिल्लक आहेत. ऑगस्टचा पहिला आठवडा कोरडा गेला. दुसऱ्या आठवड्यातही दमदार पावसाची शक्‍यता कमीच आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले. पुरेशा पावसाअभावी विदर्भातील बहुतांश धरणांमध्ये पाण्याचा साठा अल्प आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पाऊस न आल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. शिवाय उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण रूप धारण करू शकते.  

शहरात रिमझिम सरी
शहरात सोमवारी रिमझिम पावसाने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास तास दीड तास हलक्‍या सरी कोसळल्या. त्यानंतर सायंकाळीही काही भागांमध्येच रिमझिम बरसला. शहरात सकाळपासूनच आकाशात ढगांची दाटी होती. काळेकुट्ट ढग पाहून वरुणराजा धो-धो बरसतो की काय असे वाटू लागले होते. मात्र, जमीन थोडीफार ओली करून ढग गायब झाले. त्यामुळे शहरवासींचीही निराशा झाली.

Web Title: nagpur news rain weather