बलात्कारपीडितेला गर्भपाताची परवानगी नाकारली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नागपूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज बलात्कारपीडितेला गर्भपाताची परवानगी नाकारली. सामान्य रुग्णालयातील डॉक्‍टरांनी गर्भपाताला नकार दिल्यानंतर या महिलेने परवानगीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने परवानगी नाकारत ही याचिका निकाली काढली. महिलेच्या जिवाला असलेला संभावित धोका लक्षात घेऊन न्यायालयाने गर्भपाताला परवानगी नाकारली.

खामगाव येथील या महिलेला दोन मुले असून, ती एका व्यापाऱ्याकडे घरकामाला होती. या व्यापाऱ्याने दोन वेळा तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार नवऱ्याला सांगितल्यावर त्याने तिला माहेरी सोडून दिले. त्यानंतर ती माहेरच्यांकडे व्यक्त झाली. 11 फेब्रुवारीला खामगाव पोलिसांनी व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या वेळी वैद्यकीय तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी गेली असता, तिला 29वा आठवडा सुरू असल्याने डॉक्‍टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे तिने गर्भपाताच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: nagpur news rape case abortion permission cancel