दाणी कुलगुरुपदासाठी अपात्रच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नागपूर - भारताचे नागरिकत्व नसल्यामुळे डॉ. रविप्रकाश दाणी हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अपात्र आहेत, असे शपथपत्र कुलपती आणि कृषी  विद्यापीठाने बुधवारी (ता. ९) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले.

नागपूर - भारताचे नागरिकत्व नसल्यामुळे डॉ. रविप्रकाश दाणी हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अपात्र आहेत, असे शपथपत्र कुलपती आणि कृषी  विद्यापीठाने बुधवारी (ता. ९) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले.

पाचगणीतील कार्यशाळा, आर्थिक गैरव्यवहार, भारतीय नागरिकत्व नसणे आणि दुर्बिणीतून शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करणे आदीसंदर्भात तीन आमदारांनी दाणी यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यांच्यावरील आरोपांची शहानिशा करण्यासाठी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे  यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. दाणी यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्यामुळे तत्कालीन महाधिवक्ता आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यानंतर त्यांना बडतर्फ करण्याचा आदेश कुलपतींद्वारे जारी करण्यात आला. कुलपतींच्या आदेशाला दाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या 

शपथपत्रानुसार डॉ. दाणी यांनी कुलगुरुपदासाठी अर्ज करताना ते भारतीय नागरिक कायद्यातील कलम ७-बी-२-आय मधील निकष पूर्ण करतात किंवा नाही हे जाहीर करणे आवश्‍यक होते.  परंतु, त्यांनी तसे केले नाही. विदेशी नागरिक म्हणून भारतात राहण्याचा व कार्य करण्याचा अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. परंतु, त्यांना हे सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती सुरुवातीपासूनच अवैध ठरते. 

दोन्ही प्रतिवादींच्या वतीने कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. कुलगुरुपदावरून बडतर्फ करण्याच्या आदेशाला दाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांची नियुक्ती १३ ऑगस्ट २०१२ रोजी करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ येत्या १२ ऑगस्ट रोजी संपणार होता. परंतु, त्यापूर्वीच त्यांना बडतर्फ करण्यात आले. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी (ता. १०) होणार आहे.

Web Title: nagpur news raviprakash dani