चोवीस तास पाणी मिळेना, पार्किंगची समस्या

चोवीस तास पाणी मिळेना, पार्किंगची समस्या

नागपूर - शहरात चोवीस तास पाणी मिळेल आणि शहर टॅंकरमुक्‍त होईल, असे सांगण्यात आले. आजही प्रभागात ४२ टॅंकर फिरतात. नंदनवन रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे अपार्टमेंटमधील नागरिकांना होणारा त्रास अशा विविध समस्या आणि तक्रारी प्रभाग ३१ मधील नंदनवन परिसरात असलेल्या त्रिशताब्दी उद्यानात गुरुवारी (ता. २९) आयोजित मोहल्ला सभा आणि वाचक संवादात नागरिकांनी मांडल्या. समस्या सोडविण्याचे आश्‍वासन नगरसेविका व पोलिस अधिकाऱ्यांनी दिले.

दै. ‘सकाळ’तर्फे सामाजिक बांधीलकी म्हणून मोहल्ला सभा व वाचक संवादाचे आयोजन विविध प्रभागात करण्यात येत आहे. या सभांमधून परिसर आणि प्रभागांमध्ये असलेल्या विविध समस्या समोर आणून त्यांचे तत्काळ निदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. यातून हे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, नगरसेविका शीतल कामडे, पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णवर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कुंभारे, प्रशांत कामडे व सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे होते.

प्रास्ताविकातून प्रमोद काळबांडे यांनी ‘सकाळ’द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शैलेश पांडे यांनी सामाजिक जाणिवेतून ‘सकाळ’द्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून मोहल्ला सभांमधून नागरिकांना तक्रारी थेट अधिकारी आणि पोलिसांसमोर मांडता येणे शक्‍य होणार असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा. समस्या सुटल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले. संचालन व आभार सहायक वितरण व्यवस्थापक रूपेश मेश्राम यांनी मानले.

नागरिकांच्या समस्या
त्रिशताब्दी बगिचामध्ये अनेक जोडपे येऊन बसतात. शिवाय बगिचासमोरील परिसरातही त्यांचा सुळसुळाट असतो. सायंकाळ झाली की, परिसरात त्यांची संख्या अधिक दिसून येते. याचा त्रास नागरिकांना होतो. याशिवाय परिसरात एक तासही व्यवस्थित नळ येत नाही. ‘ओसीडब्ल्यू’द्वारे चोवीस तास पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे सांगितले होते. प्रभागात दोन तास सकाळी आणि दोन तास सायंकाळी असे तरी पाण्याची सोय करून द्यावी. याबद्दल वारवंवार तक्रार केली. मात्र, ते तांत्रिक कारण सांगतात. आज नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचे बिल भरत असल्यास पुरेसे पाणी द्यावे. बगीचा परिसरात वारंवार संडास, बाथरूम खराब होतात. त्यातून दुर्गंध येतो. याबद्दल नागरिकांनीही जपून वापर करण्याची गरज आहे. परिसरात असलेल्या मंदिराजवळ रिकामा हॉल आहे. तिथे पोलिस चौकी द्यावी, रिकाम्या जागेमध्ये खेळण्यासाठी कोर्टची सोय करून द्यावी.
- प्रा. प्रशांत कामडे, सामाजिक कार्यकर्ते. 

बगिचा परिसरात तयार केलेल्या ग्रीन जिमचे साहित्य नादुरुस्त आहे. अनेक साहित्याचे बेअरिंग व नट तुटलेले आहेत. नागरिकांना याचा त्रास होतो.
- जनार्दन जामळे, नागरिक

नंदनवन परिसरात असलेल्या चौकात दारूची दुकाने आहेत. इथे येणारे लोक दारू पिण्यासाठी अपार्टमेंटसमोर गाडी पार्क करतात. शिवाय शिवीगाळ करतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो. याचा बंदोबस्त करा.
- कल्पना कुंभारे, नागरिक.

सायंकाळच्या सुमारास बगिचा आणि बाहेर मुला-मुलींचे घोळके असतात. अंधाराचा फायदा घेऊन अश्‍लील चाळेही केले जातात. हा प्रकार थांबविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा.
- अनघा बोकारे, नागरिक.

बगिचा परिसरात असलेल्या बेचेंसची संख्या कमी आहे. जे बेंचेस आहेत, त्यावर पुरुष बसतात. त्यामुळे नगरसेविकेने बगिचा परिसरात अधिकचे बेंचेस लावावे.
- भारती अगळे, नागरिक.

अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील गाळ्यांचा व्यावसायिक उपयोग होतो. यामुळे समोरील फुटपाथवर फेरीवाल्यांचा त्रास वाढला आहे. अपघात होण्याची शक्‍यता बळावली आहे. अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांची व्यवस्था करावी.
- मधुकर बुचे, नागरिक.

विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांची मनोवृत्ती सुधारण्यावर समाजाचा भर असावा. त्यासाठी बगिचा परिसरात त्यांचे कौन्सिलिंग होईल काय? याबद्दल काही उपक्रम राबविता येईल काय? यावर अधिक विचार व्हावा. त्यामुळे समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट होण्यास मदत होईल.
- विजय जाधव, नागरिक.

घरासमोर कचरा घेण्यासाठी कचऱ्याची गाडी येत नाही. त्यामुळे नाइलाजाने परिसरातील नागरिक घरासमोर कचरा टाकतात. अनेकदा हा कचरा उचलल्या जात नसल्याने त्रास होतो.
- नलिनी उमप, नागरिक.

गार्डन परिसरात महिला अधिक प्रमाणात येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्याचा दृष्टीने महिला गार्डची नेमणूक करावी.
- मनीषा पापडकर, नागरिक.

नगरसेविकेने दिलेले उत्तर
उद्यानात असलेल्या विविध समस्यांची माहिती आहे. यासंदर्भात नागरिकांसोबत नेहमीच संवाद साधत असते. उद्यानात खुर्च्या कमी पडत असल्याची तक्रार आहे. ती सोडविण्यासाठी अधिकच्या खुर्च्या देण्यात येतील. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लावून धरला आहे. तो तत्काळ सोडविण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. चोवीस तास पाणी देण्यापेक्षा दोन तास सकाळी, दोन तास सायंकाळी अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी यासंदर्भात अधिकाऱ्यांना कळविले आहे. फुटपाथचा प्रश्‍न मोठा आहे. याबद्दल फेरीवाल्यांना कळविले आहे. त्यांना एकदा ताकीदही दिली. शिवाय पोलिसांना त्याची माहिती दिली आहे. लवकरच ही समस्या दूर होईल.
- शीतल कामडे,  नगरसेविका, प्रभाग क्रमांक ३१.

नागरिक व प्रशासन यांच्यात नेहमीच संवाद होण्याची गरज आहे. तो होत नसल्याने समस्यांचे समाधान होत नाही. यासाठी दोन्ही बाजूने संवाद कमी होत असल्याचे दिसते. आमचीही काही चूक असेलच. मात्र, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे. ‘सकाळ’ने या उपक्रमातून हा संवाद घडवून आणला. त्याबद्दल आभारी आहे. नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, त्यांचे तत्काळ समाधान करण्यासाठी उपाययोजना करणार आहे. विशेष म्हणजे गार्डन परिसरात पोलिसांची गस्त वाढणार आहे. तसेच पार्किंगच्या प्रश्‍नावर महापालिकेसोबत एकत्र येऊन ती सोडविण्यात येईल.
- प्रदीप रायण्णवर, पोलिस निरीक्षक, कोतवाली पोलिस ठाणे.

लहानपणापासून ‘सकाळ’चा वाचक आहे. मोहल्ला सभा व वाचक संवादातून नागरिकांनी समस्या मांडल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासन सर्वोतोपरी परिश्रम घेत आहे. प्रभागात घरफोडी व चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय आता मुला-मुलींचे अश्‍लील चाळे होत असल्याची तक्रार येत आहे. त्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात येईल. नागरिकांनीही यात सहकार्य करावे. अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्‍न हा सर्वच ठिकाणी आहे. मात्र, नंदनवन मुख्य रस्त्यावरील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. दररोज या रस्त्यावर पोलिस फेरफटका मारतील. फेरीवाल्यांवरही नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल.
- नितीन कुंभारे, सहायक पोलिस निरीक्षक, कोतवाली पोलिस ठाणे.

प्रमुख समस्या
पोलिस प्रशासनाशी सबंधित - बगिच्याबाहेर प्रेमीयुगुलांचा त्रास, फेरीवाल्यांची दादागिरी, दारूच्या दुकानात येणाऱ्यांची पार्किंग अपार्टमेंटसमोर करणे व दारूच्या नशेत शिवीगाळ करण्याचा प्रकार.
महापालिका प्रशासनाशी संबंधित - अवैध पार्किंगचा त्रास, गाळ्यांसमोर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाची समस्या, कचरा घेण्यासाठी वाहन वेळेवर न येणे, पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय नाही, बगिच्यामध्ये बेंचेसची अपुरी सोय, नादुरुस्त ग्रीन जीम व शौचालयाची अस्वच्छता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com