पाच ते नऊ रुपये प्रतिकिलो तांदूळ महागला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत तांदळाचे दर प्रतिकिलो चार ते पाच रुपयांनी वधारले. राज्यासह विदर्भात पाऊस कमी पडल्याने धानासह कापूस, तूर, उडीद, सोयाबीन, ज्वारी आणि मुगाचे उत्पादन ५० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. सणासुदींच्या तोंडावर मागणी वाढल्याने हरभरा डाळीचे भाव प्रतिकिलो सात ते आठ रुपयांनी वाढले आहे.  

सध्या भाव स्थिरावले असले तरी पुढील आठ दिवस पावसाची अशीच स्थिती राहिल्यास तांदळाचे भाव याच स्थितीत स्थिर राहतील. अन्यथा पुन्हा तांदळाचे भाव वधारण्याची शक्‍यता आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रतिकिलो ४४ रुपये किलो असलेला तांदूळ ४९ रुपयांवर गेला आहे, असे धान्य व्यापारी प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. 

जून महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली आहे. राज्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी असल्याने शेतातील पिके करपू लागलीत. पावसाची प्रतीक्षा करीत असून धरणातील पाण्याची अवस्थाही चिंताजनक आहे. चिन्नोर, श्रीराम, एचएमटी, बासमतीसह सर्वच तांदळाचे भाव प्रतिकिलो सरासरी ५ ते ९ रुपयांनी वाढले आहेत. 

महाराष्ट्रात गेल्यावर्षी पाऊस सामान्य झाल्याने शेतात उत्तम पीक झाले. २०१७ मध्ये पावसाची सुरुवात चांगली झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी धूमधडाक्‍यात केली. मात्र, गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्या पिकांची  स्थितीही चिंताजनक आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसात पावसाचे दमदार आगमन न झाल्यास सर्वच पिकांचे उत्पादन प्रभावित होईल आणि महागाई वाढण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात यंदा ५५८ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरीपेक्षा तीस टक्के कमी आहे, असे बाजाराचे जाणकार प्रताप मोटवानी म्हणाले. 

डाळीची किंमत वाढली
बैलाचा सण पोळा या दिवशी शहरासह ग्रामीण भागातही हरभरा डाळीचे पुरण खाण्याची परंपरा आहे. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे आणि सणासुदीची मागणी वाढल्याने गेल्या पंधरा दिवसांत हरभरा डाळीच्या किमतीत प्रतिकिलो सात ते आठ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुरणपोळी महागली आहे. मात्र, हा साठा भारतात असून विदेशातूनही आयात होणार असल्याने काही  दिवसांत पुन्हा डाळीचे भाव उतरतील.

Web Title: nagpur news rice rate increase