गिट्टी निघाली, रस्त्यांची ‘धूळ’धाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नागपूर - शहरातील डांबरी रस्त्यांची गिट्टी निघाली असून, संपूर्ण रस्त्यांवर पसरली आहे. या गिट्टीवरून दुचाकीधारक घसरून पडण्याची शक्‍यता आहे. ठिकठिकाणी मेट्रो रेल्वे, उड्डाणपुलाची कामे सुरू आहे. या परिसरातील डांबरी रस्त्यांवरील गिट्टीमुळे दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे. या गिट्टीमुळे धूळ उडत असून, रस्त्याने ये-जा करणारे पादचारी, दुचाकीधारकांना डोळ्यांचे व श्‍वसनाचे आजार होण्याची शक्‍यताही बळावली आहे. काही भागांतील रस्त्यांखालील सिवेज लाइन खचल्याने मोठे खड्डे तयार झाले असून, नागरिकांचा प्रवास असह्य झाला आहे. 

नागपूर - शहरातील डांबरी रस्त्यांची गिट्टी निघाली असून, संपूर्ण रस्त्यांवर पसरली आहे. या गिट्टीवरून दुचाकीधारक घसरून पडण्याची शक्‍यता आहे. ठिकठिकाणी मेट्रो रेल्वे, उड्डाणपुलाची कामे सुरू आहे. या परिसरातील डांबरी रस्त्यांवरील गिट्टीमुळे दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे. या गिट्टीमुळे धूळ उडत असून, रस्त्याने ये-जा करणारे पादचारी, दुचाकीधारकांना डोळ्यांचे व श्‍वसनाचे आजार होण्याची शक्‍यताही बळावली आहे. काही भागांतील रस्त्यांखालील सिवेज लाइन खचल्याने मोठे खड्डे तयार झाले असून, नागरिकांचा प्रवास असह्य झाला आहे. 

शहरात अनेक भागांत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे नागरिक मनस्ताप सहन करीत आहेत. आता डांबरी रस्त्यांवरील निघालेल्या गिट्टीने नागरिकांची अडचण वाढविली आहे. शहरातील अमरावती रोड, वंजारीनगर जलकुंभ ते तुकडोजी पुतळा चौक, अशोक चौक ते दिघोरी चौक, राहाटे कॉलनी चौक ते न्यू इंग्लिश हायस्कूल, कामठी रोड, रामेश्‍वरी रोड, बसवेश्‍वर पुतळा चौक ते म्हाळगीनगर चौक, ऑरेंज सिटी स्ट्रीट, अंबाझरी उद्यान ते फुटाळा चौकापर्यंतच्या संपूर्ण डांबरी रस्त्यांवर बारीक गिट्टी पसरली आहे. या गिट्टी पसरलेल्या रस्त्यांवरून तरुणाई दुचाकी जोमात पळवीत आहेत. यात बहुतेक दुचाकी लहान चाकाच्या असून पसरलेल्या गिट्टीवरून घसरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे. या बारीक गिट्टीवरून वाहने गेल्यास धूळ उडत आहे. ट्रक, बस यासारखी जड वाहने गिट्टीवरून गेल्यास मागील दुचाकीधारकाला समोरचे दिसेनासे होत आहे. ही धूळ वाहनचालकांच्या नाकातोंडात जाऊन वाहन चालविणे अवघड होते. त्यामुळेच शहरातील रस्ते निकृष्ट असल्याची ओरड होत आहे. नुकतीच मस्कासाथ येथील जीर्ण सिवेज लाइन खचल्याने रस्त्यावर मोठा खड्डा पडला. आता पुन्हा बजेरिया भागात जमनादास मार्गावरील हनुमान मंदिराजवळ रस्ता खचून जवळपास १८ फूट खोल खड्डा तयार झाला. या परिसरातील नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे हा खड्डा लक्षात येताच दुरुस्तीचे काम सुरू केले. परंतु, आता जीर्ण सिवेज लाइनमुळे शहरात कुठल्या रस्त्याला केव्हा खड्डा पडेल, याचा नेम राहिला नसल्याने नागरिकांचा प्रवास जीवघेणा झाला आहे.

दोन महिन्यांतच निघाली गिट्टी 
महाराजबाग गेटसमोरील अमरावती मार्गाचे दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हा रस्ता पहिल्याच पावसात उखडला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सेंट उर्सुला हायस्कूलसमोरील रस्ताही उखडला असून, रस्त्यावर जागोजागी बारीक गिट्टी पसरली आहे. शहरात सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे जनमंच या संघटनेने केलेल्या तपासणीत दिसून आले होते. आता डांबरी रस्त्यांचीही तपासणी करणे गरजेचे असल्याची चर्चा रंगली आहे.  

धुळीमुळे विविध रोगांची लागण 
शहरात अस्थमाचेही मोठे रुग्ण अाहेत. त्यांनी या धुळीच्या रस्त्याने चालणे म्हणजे आजार वाढवून घेण्यासारखे झाले आहे. याशिवाय शहरात सध्या सर्दी, पडसेच्या रुग्णांत वाढ झाली आहे. धुळीमुळे फुप्‍फुसाची क्षमता कमी होऊन सामान्य नागरिकांचेही आरोग्य बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या शिवाय अनेकांच्या डोळ्यांतही धूळ जात असून त्यांना दृष्टीसंबंधात आजाराचीही लागण होण्याची शक्‍यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या धुळीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्सही होऊ शकतात. 

Web Title: nagpur news road