तुटू नये दोरी रोशनीच्या आयुष्याची

तुटू नये दोरी रोशनीच्या आयुष्याची

नागपूर - रस्त्याच्या कडेला एखाद्या हिंदी गाण्याच्या तालावर झुलत्या दोरावर जगण्याचा तिचा संघर्ष इवलाशा वयापासूनच सुरू झाला होता. पोटासाठी ती रस्त्यावर कसरत करते. परंतु, इतरांचे मनोरंजन होते. दाद देणाऱ्यांकडून रुपया दोन रुपये तिच्या भिक्षापात्रात पडतात. जगण्याचा हा तिचा नित्यक्रम सुरू होता. अचानक उंचीवर बांधलेला दोर तुटल्यागत तिचे आयुष्यही  अंधातरी झालं. किडनीचा आजार जडला अन्‌ रस्त्यावरचा पोटासाठी सुरू असलेला तिचा खेळ थांबला. रोशनी वाघोळे तिचे नाव. 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या रोशनीवर उपचार सुरू आहेत. जगण्यासाठी तिचा संघर्ष  सुरू आहेच. परंतु, आता जीवन-मृत्यूच्या संघर्षातही ती अडकली आहे. सध्या तिची भटकंती आयुष्य सुपरच्या खाटेवर आहे. रोशनीच्या आयुष्यात पुन्हा दोरीवरची कसरत करण्यासाठी ती  उभी व्हावी यासाठी समाजाकडून मदतीची गरज आहे. सुपर-मेडिकलच्या वैद्यकीय सामाजिक अधीक्षकांकडून रोशनीच्या आयुष्याची कथा ऐकून आपोआपच डोळे पाणावतात. 

डोंबारी समाजातील रोशनी आईवडिलांच्या प्रेमाला लहानपणीच पारखी झाली. रस्त्यावर खेळ दाखवून रोशनीला ते जगवत होते, परंतु आईवडील दोघेही मृत्यू पावले. या चिमकुलीचा आधारच कोसळला. अजाणत्या वयात ही चिमुकली जगण्याच्या धोकादायक खेळात अडकली. तिच्या पालन करण्याचा प्रश्‍न एका नातेवाइकाने सोडवला. तिला आधार मिळाला. परंतु, पोटासाठी खेळण्या-बागडण्याच्या, शाळा शिकण्याच्या वयात जीवघेण्या दोरीवरच्या कसरती करू लागली. आभाळाच्या दिशेने बांधलेल्या दोरीवर उभी राहून पोटासाठी मृत्यूला कवटाळण्याचे कसब जणू ती आईच्या पोटातून शिकून आली. 

चित्तथरारक कसरत करणे हेच तिचे जीवनगाणे असताना  सुपरच्या खाटेवर ती आयुष्याच्या घटका मोजत आहे. नेफ्रॉटिक सिंड्रोम असल्याचे निदानात स्पष्ट झाले. तत्काळ उपचार न झाल्यास किडनी निकामी होण्याची भीती आहे. आयुष्य भटकंती असल्याने शासनाच्या मोफत उपचाराचा लाभ मिळणार नाही, ही बाब लक्षात आल्यानेच मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय सामाजिक अधीक्षकांनी रोशनीला उपचारादरम्यान मदतीसाठी सामूहिक प्रयत्न सुरू केले. 

भास्कर लोंढे, किशोर धर्माळे, आशीष वाळके, हरीश गजबे, शशीकांत नागपुरे या साऱ्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी मुंबईच्या चाईल्ड लाइन, स्टार्ट सामाजिक संस्थेशी संपर्क साधत काही प्रमाणात मदत मिळवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com