आधी विकास नंतर 'सबका साथ'- मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप

नागपूर : 'एक पार्टी, एक सरकार, एक महापुरुष देशाचे भाग्य बदलू शकत नाही. त्यासाठी सर्वांची साथ आवश्‍यक आहे. मात्र, सर्वांची साथ मिळण्याकरिता आधी विकास होणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेवर त्यांनी हा अप्रत्यक्ष टोला लगावला. त्याचवेळी देशात अनेक चांगली कामे होत असल्याचे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते.

रेशीमबाग मैदानावर झालेल्या या सोहळ्याला नेपाळचे माजी सेनाप्रमुख जनरल रुक्‍मागंत कटवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरसंघचालकांनी 'देश आगे बढ रहा है' असे म्हणतानाच विकासाच्या दिशेने जाण्यासाठी समाजालाही स्वतःमध्ये काही बदल घडवावे लागतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. देशाची प्रगती होत असताना त्यात बाधा आणण्याचे काम काही घटक करीत आहेत. समाजात उत्पात माजविण्याची कारवाई अद्याप थांबलेली नाही. त्यांच्याविरुद्ध अधिक कठोर व्हावे लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काश्‍मीरमधील कारवायांच्या विरोधात पाकिस्तानला प्रखर उत्तर देण्याची गरज आहे, असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला सुचविले.

पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या निर्णयावरून सरसंघचालकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या 1920 मधील नागपुरात झालेल्या अधिवेशनात गोवंश हत्याबंदीचा ठराव येणार होता, असा संदर्भ सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात दिला. ते म्हणाले, 'नागपुरात झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या व्यवस्थेचा भार डॉ. हेडगेवार यांच्यावर होता. या अधिवेशनात संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याची कॉंग्रेस घोषणा करेल, असे दोन ठराव येणार होते. डॉ. हेडगेवार यांनी त्यासाठी प्रयत्नही केले.' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या पाच वर्षांपूर्वीची ही घटना होती, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Web Title: nagpur news RSS mohan bhagwat first vikas, then sabka sath