साहित्य संमेलन बुलडाण्यात 

साहित्य संमेलन बुलडाण्यात 

नागपूर - मेहकर तालुक्‍यातील हिवरा आश्रम (जि. बुलडाणा) येथे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज जाहीर केले. साहित्य संमेलनांच्या 140 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बुलडाणा जिल्ह्याकडे यजमानपद आल्यामुळे वऱ्हाडातील साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने ग्रामपंचायत भागात होणारे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे. 

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बडोदा, दिल्ली आणि हिवरा आश्रम (बुलडाणा) या तीन ठिकाणचे प्रस्ताव विचारात घेण्यात आले. त्यापैकी दिल्लीसाठी पूर्णपणे अनुकूल परिस्थिती होती. संमेलनाचे यजमानपद दिल्लीच्याच वाट्याला येईल, हेही निश्‍चित होते; परंतु शनिवारी सकाळी महामंडळाकडे पत्र पाठवून दिल्लीतील संस्थेने माघार घेतली आणि हिवरा आश्रमची शक्‍यता बळावली. बडोद्याच्या बाजूने काही सदस्यांनी जोर लावला, मात्र हिवरा आश्रमवरच शिक्कामोर्तब करण्यात आले. 

डॉ. जोशी म्हणाले, "दिल्लीच्या संदर्भात स्थळ निवड समितीमध्ये जवळजवळ एकमत होते; पण दिल्ली मराठी प्रतिष्ठानने यंदा असमर्थता व्यक्त केल्यामुळे बुलडाणा आणि बडोद्याचा विचार करण्यात आला. त्यात विदर्भासह पुणे, मुंबई आणि बृहन्महाराष्ट्रातील सदस्यांनी हिवरा आश्रमच्या बाजूने कौल दिला.' "हे संमेलन विदर्भ साहित्य संघाच्या अखत्यारित होत आहे. त्यामुळे पालक संस्थेची जबाबदारी मोठी आहे. शिवाय बुलडाणा जिल्ह्यात साहित्य संघाच्या 11 शाखा आहेत. महामंडळ विदर्भात असताना एकतरी संमेलन विदर्भात व्हावे, असे अपेक्षित होते. त्यात हिवरा आश्रमाचा प्रस्ताव अधिक वरचढ ठरत होता,' असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर भाले, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे, प्रा. मिलिंद जोशी, पद्माकर कुळकर्णी, प्रकाश पायगुडे यांची उपस्थिती होती. 

हिवरा आश्रमची वैशिष्ट्ये 
हिवरा येथील विवेकानंद आश्रम या संस्थेकडे एकाचवेळी तीन हजार लोकांची निवास आणि पाच हजार लोकांची भोजन व्यवस्था करण्याची क्षमता आहे. 30 ते 40 हजार रसिकांची आसन व्यवस्था करता येईल, असे तीन व्यासपीठ कायमस्वरूपी सज्ज आहेत. 

कनेक्‍टीव्हिटी... 
रेल्वे जंक्‍शन असलेले शेगाव हे हिवरा आश्रमपासून एक तासावर, तर मलकापूर जंक्‍शन दीड तासांवर आहे. बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असलेले मेहकर येथून अवघ्या 12 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. 

हिवरा येथील विवेकानंद आश्रम ही संस्था कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा पुढाऱ्याच्या आश्रयाने चालत नाही. आजवर राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळेच बुलडाण्यात संमेलन होऊ शकले नव्हते. मात्र, स्वयंभू असलेल्या विवेकानंद आश्रमने संमेलनासाठी प्रस्ताव देऊन आदर्श उभा केला आहे. 
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी  अध्यक्ष, अ.भ. मराठी साहित्य महामंडळ 

"सकाळ'ला श्रेय  
हिवरा येथील विवेकानंद आश्रमकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद येण्यात "सकाळ'चेही श्रेय आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. संस्थेने प्रस्ताव दिल्यापासून अधिकृत घोषणा होईपर्यंत "सकाळ'ने सातत्याने हिवरा आश्रमच्या वैशिष्ट्यांना अधोरेखित केले. वऱ्हाडातील साहित्यिक व साहित्यप्रेमींनीदेखील या संदर्भात सातत्याने "सकाळ'च्या माध्यमातून हिवरा आश्रमकडे लक्ष वेधले होते. 

अध्यक्ष निवड 5 ऑक्‍टोबरपासून 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया 5 ऑक्‍टोबरपासून सुरू होईल, असे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. पाच ऑक्‍टोबरला महामंडळाकडून निवडणूक अधिकाऱ्याकडे मतदारयादी रवाना करण्यात येईल. त्यानंतर 14 ऑक्‍टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. 23 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज मागे घेता यणार आहेत. 31 ऑक्‍टोबरपर्यंत मतपत्रिका मतदारांकडे रवाना होतील आणि 9 डिसेंबरपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवता येणार आहेत. मतमोजणी 10 डिसेंबरला होईल आणि त्याच दिवशी नवीन अध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com