अधिकारांसाठी वाजणार तृतीयपंथीयांची ‘टाळी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नागपूर - तृतीयपंथीयांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. तसेच उच्चशिक्षितही आहेत. प्रत्येकजण पोटासाठी काम करतो. आता शिक्षणासंदर्भातील जनजागृती वाढली आहे. आमच्यातलेच काही डॉक्‍टर व प्राचार्य, तर काही दहा ते पाचमध्ये नोकरी करणारेही आहेत. संविधानातील आमचा अधिकार संस्कृतीने नाकारला. हा अधिकार मिळविण्यासाठीच आजपर्यंत ‘टाळी’ वाजत आली आहे आणि पुढेही वाजत राहणार, असा निर्धार किन्नर आखाड्याचे नेतृत्व करणाऱ्या महंत पवित्रा निंभोरकर यांनी गुरुवारी (ता. १८) व्यक्त केला.

नागपुरात त्या कार्यक्रमासाठी आल्या असताना ‘सकाळ’च्या रामदासपेठ येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तृतीयपंथीयांचे अधिकार, समाजाकडून होणारी कुचंबणा, प्रगतीचे मार्ग आदी विषयांवर त्यांनी संवाद साधला. ‘तृतीयपंथी हा समाजातील असा एक घटक आहे, जो नऊशे  वर्षांपासून धर्माच्या बाहेर होता. २०१४ मध्ये समाजाचा घटक म्हणून आम्हाला मान्यता मिळाली आणि कुंभमेळ्यांमध्येही आम्ही किन्नर आखाडा स्थापन केला. सुरुवातीला तिथेही अडचणी आल्या. परंतु, त्यावर मात केली. आजही काही आखाड्यांसाठी संघर्ष सुरू आहे. आम्ही जन्माने हिंदू धर्माचे आहोत. त्यामुळे वेगळी चूल मांडायची असेल तरी ती हिंदू धर्माच्या आधारानेच निर्माण करायची होती. किन्नर हे उपदेवतांमध्ये येतात. संतांच्याही आधी आमचे स्थान आहे.  किन्नर आखाड्यामुळे तृतीयपंथीयांना एक आधार मिळतोय. किन्नर आहेत म्हणून लहानपणीच घरातून काढून टाकलेल्या मुलांना निराश होण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांना किन्नर आखाड्याचा आधार आहे, असेही पवित्रा निंभोरकर म्हणाले.

देवा-धर्माचाच आधार का घ्यावा वाटला, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, इतरांचा आहे, तसा धर्म आणि देवांवर आमचाही अधिकार आहे. आम्हालाही ईश्‍वराकडे काही मागायचे आहे. पूर्वीच्या काळात राजा-महाराजांच्या दरबारातही तृतीयपंथीयांचा समावेश होता. मग आज मंदिरात दर्शन घेताना किंवा कुंभमेळ्यात प्रवेश घेतानाच आमच्या अधिकारांवर प्रश्‍न का उपस्थित होतात?.

आशीर्वादापुरते आम्ही चांगले
समाजात वावरताना प्रचंड अवहेलना आणि कुचंबणा सहन करावी लागते. परंतु, कुणाला  आशीर्वाद हवा असेल, तर तेवढ्यापुरता आम्ही चांगले असतो. आम्हाला समाजाची गरज असते तेव्हा मात्र ‘दस रुपये क्‍यों देना’ असा प्रश्‍न विचारला जातो, अशी खंतही पवित्रा व्यक्त करतात.

आश्रमाची स्थापना लवकरच
उज्जैन येथे किन्नर आखाड्यातर्फे लवकरच आश्रमाची स्थापना करण्यात येईल. आचार्य महामंडलेश्‍वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे. आश्रमात किन्नरांसाठी शिक्षण व आरोग्याच्या सुविधा असतील. त्याला शासकीय पातळीवर मदत मिळावी म्हणून मध्य प्रदेश सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे, अशी माहिती पवित्रा यांनी दिली.

Web Title: nagpur news sakal