सक्‍करदरा ठाण्यातील वाहनांचा नव्याने लिलाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नागपूर - सक्‍करदरा पोलिस ठाण्यातील वाहनांच्या लिलावात घोळ झाल्यामुळे पोलिस विभागातील भ्रष्टाचारी धोरण चव्हाट्यावर आले. याप्रकरणी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस आयुक्‍तांकडे तक्रारीसुद्धा केल्या. त्यामुळे ठाण्यातील वाहनांचा लिलाव नव्याने करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी (शहर) शिरीष पांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

नागपूर - सक्‍करदरा पोलिस ठाण्यातील वाहनांच्या लिलावात घोळ झाल्यामुळे पोलिस विभागातील भ्रष्टाचारी धोरण चव्हाट्यावर आले. याप्रकरणी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस आयुक्‍तांकडे तक्रारीसुद्धा केल्या. त्यामुळे ठाण्यातील वाहनांचा लिलाव नव्याने करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी (शहर) शिरीष पांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शनिवारी सक्‍करदरा पोलिस ठाण्यात वाहनांचा लिलाव नायब तहसीलदार सुनील साळवे यांच्या उपस्थितीत केला. मात्र, सक्‍करदरा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मधुकर बोकडे यांनी भंगार विक्रेत्यांशी संगनमत करून गुपचूप लिलाव प्रक्रिया पार पाडली. नायब तहसीलदार साळवे यांना अंधारात ठेवून लिलावात बोली लावण्यासाठी केवळ चारच जण आल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकारी एसीपी रवींद्र कापगते व निरीक्षक आनंद नेर्लेकर दोघेही अनुपस्थित असताना पाच मिनिटांतच लिलाव पार पडला. 

दुपारी १२ ची वेळ असताना पोलिस ठाण्याच्या मागच्या परिसरात ११ वाजताच लिलाव आटोपला. त्यामुळे उपस्थित असलेल्या नागरिकांनी लिलाव प्रक्रियेवर आक्षेप घेतला.

साळवे यांनी पुन्हा लिलाव घेण्यास नकार दिल्यामुळे नागरिकांनी ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे तीन तास तणावाचे वातावरण होते. या प्रकरणाबाबत काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे तक्रारी केल्या. दोन्ही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. तसेच एसीपी कापगते यांनीही उपविभागीय अधिकारी यांच्याशी लिलाव प्रक्रियेसंदर्भात पत्रव्यवहार केला. मंगळवारी उपविभागीय अधिकारी शिरीष पांडे यांनी तक्रारींची शहानिशा करीत नायब तहसीलदार सुनील साळवे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा नव्याने लिलाव करण्याच्या सूचना सावळे यांना दिल्याची माहिती आहे.

बोकडेंची कारकीर्द वादग्रस्त
पोलिस उपनिरीक्षक मधुकर बोकडे यांनी दोन महिन्यांपूर्वी सक्‍करदरा ठाण्यात जप्त बुलेटची चाके काढून घेतली होती. यासोबतच काही सुटे भागही काढले. या प्रकाराची माहिती पत्रकाराने आयुक्‍तांना दिली. आयुक्‍तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत बोकडेंना सूचना दिल्या होत्या. तेव्हा दोन तासांत त्यांनी चाके लावली, अशी माहिती पोलिस ठाण्यातून मिळाली. त्यामुळे अपारदर्शकपणे लिलाव करणाऱ्या बोकडेंची कारकीर्द वादग्रस्त आहे.

Web Title: nagpur news sakal news impact