गठ्ठ्याने कुणालाही अर्ज देऊ नका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नागपूर - अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेतील नोंदणीसाठी शाळा आणि उपसंचालक कार्यालयाद्वारे सीबीएसई आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे शिकवणी वर्गांशी ‘टाय-अप’ असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असल्याने त्याचा फायदा शिकवणी वर्गांना होणार असल्याची भीती व्यक्त होत होती. त्यावर ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यावर सहायक संचालकांनी केंद्रातून विद्यार्थीनिहायच अर्ज वाटप करण्याचे निर्देश देत गठ्ठ्याने कुणालाही अर्ज देऊ नका, अशी ताकीद दिली. शिवाय केंद्रातील प्रत्येक दिवशीचा हिशेब सादर करण्याचे आदेशही कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता. ५) सुरू झाली. त्यातील पहिल्या टप्प्यात माहिती पुस्तिकेचे वाटप शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून करण्यात येत आहे. याशिवाय सीबीएसई आणि बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील १९ कनिष्ठ महाविद्यालयांत केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, केंद्र देण्यात आलेल्या बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांचे शिकवणी वर्गांशी ‘टाय-अप’ आहे. त्यामुळे बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या निर्णयाबद्दल शाशंकता होती. एकीकडे शासनाकडून शिकवणी वर्गांविरुद्ध अभियान छेडण्यात आले असताना, दुसरीकडे उपसंचालक कार्यालयाकडून अशा प्रकारे केंद्र देण्यात येत असल्याने शासनाच्या उद्देशाला तडा जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे दिसून आले. दरम्यान, यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच सहायक संचालक डॉ. शिवलिंग पटवे यांनी तत्काळ केंद्र देण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधून त्यांना एकावेळी गठ्ठा अर्ज कुणालाही न देता, प्रत्येक विद्यार्थ्याला एक वा दोन अर्जांचे वाटप करावे, असे निर्देश दिले. तसेच प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही बजावले.  

बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांचे शिकवणी वर्गांसोबत ‘टाय-अप’ आहे, ही बाब खरी आहे. मात्र, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सोयीसुविधा आहेत, तिथेच केंद्रे दिलेली आहेत. या केंद्रांवर कुठलाही गैरप्रकार होणार नाही, याची संपूर्ण काळजी विभागाकडून घेण्यात आलेली आहे. तशा सूचनाही महाविद्यालयांना दिलेल्या आहेत. 
डॉ. शिवलिंग पटवे,  सहायक संचालक, उपसंचालक कार्यालय

Web Title: nagpur news sakal news impact education admission