सिकलसेलग्रस्तांच्या लढ्याला "पद्म' सन्मानाचे कोंदण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

नागपूर  - आयुष्यातील 40 वर्षे सिकलसेलग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणारे दिवंगत संपत तुकाराम रामटेके यांच्या संघर्षाला "पद्मश्री' सन्मानाचे कोंदण लाभले आहे. 15 नोव्हेंबर 2017 ला संपत रामटेके यांचे निधन झाले. पण, त्यांच्या चार दशकांच्या असामान्य कामगिरीची दखल घेत त्यांना मरणोपरान्त "पद्मश्री' जाहीर करण्यात आला. यापूर्वी सुंदरलाल पटवा, धीरूभाई अंबानी आणि भूपेंद्र हजारिका यांना मरणोपरान्त "पद्मश्री'ने गौरविण्यात आले होते. 

चंद्रपूर जिल्ह्यातील महादवाडी हे संपत रामटेके यांचे जन्मस्थान. त्यांची सिकलसेलविरुद्धची लढाई चंद्रपूरमधूनच सुरू झाली व ती संसदेपर्यंत पोहोचवली. त्यांच्या कामाची पुढे संयुक्त राष्ट्रसंघानेही दखल घेतली. वेस्टर्न कोल फिल्ड येथे अधीक्षक अभियंतापदावर असताना सन 2007 मध्ये वेकोलिने सिकलसेलग्रस्तांसाठीचा त्याग आणि संघर्ष लक्षात घेता पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. परंतु, हा बहुमान त्यांना तेव्हा मिळाला नव्हता. अभिनेता आमिर खान याने "सत्यमेव जयते' या कार्यक्रमात संपत रामटेके यांना सहभागी करून घेतले व अधिक व्यापक रूपात त्यांचे कार्य पोहोचविले. सिकलसेलग्रस्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकाकी लढणारा कार्यकर्ता म्हणून संपत रामटेके यांची ओळख निर्माण झाली होती. 

रामटेके यांनी सिकलसेलग्रस्तांना उपचारासह विविध सवलती उपलब्ध करून देण्याचा लढा सुरू ठेवला. त्याचाच परिणाम म्हणून मेयोमध्ये सिकलसेल संशोधन केंद्र, मोफत उपचार, गरीब सिकलसेलग्रस्तांना 600 रुपये मासिक मानधन, दहावी आणि बारावीच्या सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना 20 मिनिटे अधिकचा वेळ आदी सोयी पुरविण्यात आल्या. 2007 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात सिकलसेलचा समावेश करण्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले. रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलतीसहित सिकलसेलग्रस्तांना दिव्यांग व्यक्तीचे अधिकार आणि कायदा यात समावेश करण्याची लढाई रामटेके यांनी जिंकली. सिकलसेलग्रस्तांसाठी लढणे हेच आयुष्याचे अंतिम ध्येय त्यांचे होते. 

जया रामटेकेंना अश्रू अनावर 

संपत रामटेके यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच त्यांच्या पत्नी जया रामटेके यांना अश्रू अनावर झाले. या संदर्भातील वृत्त कळल्यावर भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याजवळ शब्द नव्हते. स्मिता पाटील यांच्या नावाने सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा स्मिता स्मृती पुरस्कारदेखील संपत रामटेके यांना काही दिवसांपूर्वीच मरणोपरान्त प्रदान करण्यात आला होता. 

Web Title: nagpur news Sampat Ramteke award