समृद्धी महामार्गग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी हिंगणा तालुक्‍यामधील शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीसाठी पाचपट मोबदला मिळणार आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी (ता. ९) सुनावणी झाली. सुनावणीत राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढल्याची माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी हिंगणा तालुक्‍यामधील शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीसाठी पाचपट मोबदला मिळणार आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी (ता. ९) सुनावणी झाली. सुनावणीत राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढल्याची माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हा महामार्ग १० जिल्ह्यांमधून जात आहे. यानुसार जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भूसंपादनासाठी कायद्यानुसार मोबदला आणि २५ टक्के अतिरिक्त मोबदला असा पाचपट मोबदला देण्यात येत आहे. मात्र, हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अडीचपट मोबदला देण्यात  येत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. यामुळे हिंगणा तालुक्‍यातील सुकळी, वायफळ, पिंपवळधरा, दाताळा, सालई दाभा, बोरगाव, रिठी, हळदगाव आदी गावांमधून कवडुजी भोयर व अन्य ४१ जणांनी रिट याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, २६ मे २०१५ रोजी अधिसूचना काढली. त्यानुसार  हिंगणा हे महानगर क्षेत्र म्हणून घोषित केले. त्या आधारे हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना केवळ अडीचपट मोबदला देण्यात येत होता. याउलट वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला दिला जात असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

हिंगणा हे महानगर क्षेत्र घोषित केले असले तरी येथील लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर आधारित आहे. यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणेच हिंगण्यातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला देण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सरकारने अधिसूचना काढल्याचे सांगण्यात आले.

यानुसार निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांना गुणांक २ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या शेतकऱ्यांच्या जमिनी जरी मेट्रो रिजनमध्ये असल्या तरी त्या कृषी जमिनी असल्याने त्यांना गुणांक २ लागू होणार आहे. शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाल्याचे लक्षात घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. प्रदीप क्षीरसागर, तर सरकारतर्फे सरकारी  वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.

काय आहे गुणांक?
एखाद्या जमिनीचा बाजारभाव शंभर रुपये असल्यास त्याला गुणांक २ लागल्यास १०० गुणीला २=२०० आणि १००% सांत्वना २००+२००=४०० असा चौपट मोबदला अधिग्रहणामध्ये मिळतो. परंतु, सरळ खरेदीद्वारे अधिग्रहणामध्ये २५% अतिरिक्त मिळत असल्याने मोबदला  ५०० रुपये होईल. याच ठिकाणी गुणांक १ लागल्यास दोनपट आणि १.५० (दीड) लागल्यास तीनपट मोबदला मिळतो. सरळ खरेदीत अनुक्रमे अडीच पट आणि पावणेचार पट मोबदला मिळतो. यामुळे नवीन अधिग्रहण कायद्यात मोबदला ठरविताना गुणांक हा महत्त्वाचा घटक ठरतो.

Web Title: nagpur news samruddhi highway affected farmer