मागण्यांबाबत कालमर्यादा निश्‍चित करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

नागपूर - मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनातच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत "टाइम फ्रेम' निश्‍चित करावी, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी पटवर्धन मैदानावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केलेल्या घोषणा व प्रत्यक्ष कार्यवाहीसंदर्भात लेखी खुलासा करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.

कोपर्डी येथील अत्याचार व हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले. या पार्श्‍वभूमीवर मराठा समाजाने राज्यभरात 58 मूक मोर्चे काढून मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्या रेटल्या. या मागण्या मान्य करण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. मात्र, पूर्तता होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

कोपर्डी हत्याकांडाची बळी ठरलेल्या निर्भयाच्या वडिलांसह संघटनेचे रवींद्र काळे पाटील, रमेश केरे पाटील, पूजा मोरे यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलकांनी शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदविला. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत मागण्यांबाबत चर्चा केली. निर्भयाच्या वडिलांनीच समाजाच्या मागण्या मांडल्या. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलनात सहभाग राहील. समाजबांधवांच्या जागृतीसाठी जिल्हावार दौरे करण्यात येणार असून, त्यातही सहभागी होण्याची भूमिका त्यांनी मांडली.

समाजाच्या मागण्या -
- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत शासनाने पाठपुरावा करावा.
- चालू शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करावे.
- ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या स्थापन कराव्यात.
- शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्या.
- शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था कार्यान्वित करा.
- छत्रपती शिवराय आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम तत्काळ सुरू करा.

1 जानेवारीपासून राज्यात उद्रेक
मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचे मुख्यमंत्री व मंत्री सांगतात. नेमक्‍या कोणत्या मागण्या मान्य झाल्या त्याचा जाहीर खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. संबंधित विभागासोबत झालेल्या बैठकांचे मिनिट्‌स जाहीर करावे. मागण्या मान्य न केल्यास 1 जानेवारीपासून राज्यात उद्रेकाला प्रारंभ होईल. मार्च महिन्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास गावागावांत सरकारविरोधात हल्लाबोल सुरू होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे रवींद्र काळे पाटील यांनी दिला.

Web Title: nagpur news Set deadline for demands