माजी खासदार प्रकाश जाधव शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख

माजी खासदार प्रकाश जाधव शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख

नागपूर - रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे नागपूर शहराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर जाधव यांच्या नावाची घोषणा केली. 

जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आघाडी उघडली होती. निष्क्रिय असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन हरडे यांना हटविण्याची मागणी केली होती. अन्यथा बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी २३ जानेवारीपासून रेशीमबाग येथील शिवसेना भवनासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. यामुळे शिवसेनेत चांगलीच खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांनी विरोधक आणि जिल्हाप्रमुखांच्या निवडक समर्थकांना चर्चेसाठी मातोश्रीवर बोलावले होते. दोन्ही गटांचे गाऱ्हाणे व  म्हणने ऐकून घेतल्यानंतर सतीश हरडे यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी संपर्कप्रमुख राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते प्रामुख्याने उपस्थित होते. 

विधानसभेच्या निवडणुकीत दक्षिण नागपूरमधून उमेदवारी नाकारल्याने तत्कालीन जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून सतीश हरडे  यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून हरडे कायम होते.  त्यांच्याच नेतृत्वात महापालिकेची निवडणूकसुद्धा झाली होती. आमदार तानाजी सावंत यांना निवडणूकप्रमुख नेमण्यात आले होते. मात्र, शिवसेनेने शेवटपर्यंत महापालिकेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याऐवजी भाजपातील बंडखोर तसेच असंतुष्टांना प्राधान्य दिले होते. मात्र, याचा काहीच फायदा शिवसेनेला झाला नाही तर उलट नुकसानच झाले. त्यापूर्वी सहा नगरसेवक शिवसेनेचे होते. आता दोनच नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. 

हरडे विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस एवढे दोनच कार्यक्रम शहरात सुरू असल्याचा आरोप केला. अध्यक्षांच्या दुर्लक्षामुळे शिवसेना भवनचे भाडे थकले, बिल भरले नसल्याने वीज कापल्याचेही निदर्शनास आणून दिले. आता जिल्हाध्यक्ष  नियुक्त करताना बाहेरून आलेल्या उपऱ्यांना संधी देऊ नये तर निष्ठावंत शिवसैनिकाचा विचार करावा, अशीही मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com