शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी विदर्भात वाजवला ‘ढोल’

शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी विदर्भात वाजवला ‘ढोल’

नागपूर - कर्जमाफीनंतर दररोज निर्णय बदलला जात असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कर्जमाफीला पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जिल्हा बॅंकांनी ठळकपणे जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी सोमवारी (ता. १०) नागपूरसह विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बॅंकेसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन केले. या वेळी शिवसैनिकांनी ढोल वाजवून संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली. यासंदर्भातील निवेदनही बॅंक व्यवस्थापकांना देण्यात आले.

 राज्य शासनाच्या बदलणाऱ्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सोमवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर ढोल वाजविले. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणाऱ्या व जबरदस्तीने कर्जवसुली करणाऱ्या जिल्हा बॅंकेसमोर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, या मागणीसाठी शिवसेनेने राज्य सरकारच्या विरोधात नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, जिल्हाप्रमुख सतीश हरडे, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, जिल्हाप्रमुख राजू हरणे यांच्या नेतृत्वात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर शिवसैनिकांनी ‘ढोल वाजवा’ आंदोलन केले. जिल्हा  बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. सी. राठोड यांना शिवसैनिकांनी निवेदन दिले. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिक  उपस्थित होते.  यवतमाळ येथील आझाद मैदानातून ‘ढोल बजाओ’ आंदोलनाला सोमवारी (ता. १०) सुरुवात झाली. राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून पेरणीसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप अपवाद सोडल्यास शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांना तत्काळ कर्जवाटप करावे, अशा मागण्याचे निवेदन शिवसेनेतर्फे देण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर, संतोष ढवळे, शहरप्रमुख पराग पिंगळे उपस्थित होते. वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून निघालेला मोर्चा जिल्हा अग्रणी बॅंकेवर धडकला. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा उपनेते अशोक शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हा  अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक वामन कोहाड यांना निवेदन देण्यात आले. 

भंडारा येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले आणि माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. बॅंक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील एकही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नसल्याचा आरोप जिल्हाप्रमुख श्री. पटले यांनी केला.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कर्जमाफी झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना शाखा गोंदियातर्फे बॅंक व्यवस्थापकांना देण्यात आले. वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान योजनेचा लाभ देण्याची मागणी शिवसेनेने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com