सिख सिकलगार समाजाच्या उन्नतीचे शस्त्र शिक्षणच

सिख सिकलगार समाजाच्या उन्नतीचे शस्त्र शिक्षणच

नागपूर - सिख सिकलगार समाज धाडसी आहे. मेहनती आहे. बुद्धिमान आहे. राजे महाराजे, शेती आणि विकासाच्या कार्यात राहिलेला हा समाज स्वातंत्र्यानंतर मात्र शासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचित आहे. सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्याने या समाजाला सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठेवले आहे. हा समाज असंघटित असून आता या समाजातील भावी पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर श्रद्धा घरी ठेवून ‘शिक्षणा’चा ध्यास घ्यावा. शिक्षण हाच  सिख सिकलगार समाजाच्या उन्नतीचे शस्त्र आहे, याचा वापर या समाजाने करावा, असा सूर सिख सिकलगार समाजाच्या प्रश्‍नावर आयोजित गोलमेज परिषदेतून पुढे आला.   

सिख सिकलगार समाजाच्या प्रश्‍नांवर चिंतन करण्यासाठी रविवारी (ता. २७) आमदार निवास येथे गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक ‘सकाळ’च्या पुढाकारातून अखिल सिख सिकलगार विकास मिशनच्या वतीने या परिषदेचे आयोजन केले. या समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आंदोलक कमलसिंग बावरी अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भय्याजी खैरकर, ओबीसी नेते नितीन चौधरी प्रमुख पाहुणे होते.  

खैरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेतून अल्पसंख्याकांचे प्रश्‍न मांडले. सिख सिकलगार समाज विशेष कौशल्यवान समाज असूनही या समाजाचा आर्थिक स्तर वाढला नसल्याची खंत व्यक्त केली. नितीन चौधरी म्हणाले, हा परंपरागत व्यवसायी समाज स्वतःच्या श्रमावर आणि घामावर जगत असून देशाच्या उन्नतीमध्ये मोठे योगदान आहे. गुन्हेगारी जमातीचा ठपका या समाजावर असल्याने आजही प्रवाहाबाहेर हा समाज आहे. या समाजाच्या विकासाचा अजेंडा तयार करण्यात यावा असेही चौधरी म्हणाले. प्रगतीसिंग बावरा यांनी  समाजातील शिक्षित तरुणांना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची खंत आपल्या मनोगतातून व्यक्त केली. समाज आजही अस्थायी अवस्थेत आयुष्य जगत असून घरकुलापासून वंचित असल्याचे बहादुरसिंग जुनी यांनी सांगितले. हिंगोलीचे ठाकूरसिंग बावरी, संघटित शक्ती उभारल्यास  समाजाला खरा न्याय मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. गुरू दयालसिंग जुनी यांनी व्यक्तिगत अहंकार बाजूला ठेवून समाजाने आता कमलसिंग यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले. पूनमसिंग जुनी यांनी या समाजातील दुःखाची कथा सांगितली. रतनसिंग बावरी, जयदेवसिंग बावरी, तरणसिंग बावरी, इंदर कौर बावरी, मन कौर बावरी, मंगल कौर बावरी, गुरुचरण कौर भोंड यांच्यासह राज्यातील ठिकठिकाणांहून प्रमुख प्रतिनिधी गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सकाळचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे यांनी केले. आभार रनतनसिंग बावरी यांनी मानले. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने मोहन चव्हाण, डॉ. एम. ए. रशीद, जावेद देशमुख, अशरफ बेलीम, लक्ष्मणराव शुक्‍ला, संतोष मकरंदे, मुकुंद अडेवार आदींचा समावेश होता.  

ही तर आमच्या स्वातंत्र्याची लढाई - कमलसिंग बावरी  
गुरू गोविंदसिंग यांच्यासोबतीने हा समाज महाराष्ट्रात तीनशे वर्षांपूर्वी वसला आहे. मंडल आयोगाच्या माध्यमातून या समाजाची भटक्‍या विमुक्तांमध्ये नोंद झाली. परंतु, अद्याप हा समाज पोटासाठी भटकंती करीत आयुष्य जगत आहे. या समाजाला शिक्षण मिळावे. रोजगार उपलब्ध व्हावा, कौशल्यविकास योजनेचा लाभ मिळावा. सत्तर वर्षांपूर्वी मिळालेल्या स्वातंत्र्यातून पदरात काहीच पडले नाही. आता सिख सिकलगार समाजाला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी समाजाची शक्ती उभारण्याचे काम करण्यावर भर देण्यात येईल असा संकल्प कमलसिंग बावरी यांनी बोलून दाखवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com