क्रीडासंकुलातील ‘अरिजित नाइट’ रद्द

क्रीडासंकुलातील ‘अरिजित नाइट’ रद्द

नागपूर - ऐन राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या तोंडावर मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात गाण्यांच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी देऊन खेळाडूंसह बॅडमिंटन संघटनेचाही रोष ओढवून घेतला होता. खेळाडूंच्या अधिकारावर घाला घालणाऱ्या या कार्यक्रमासंदर्भात ‘सकाळ’मध्ये ठळकपणे बातमी प्रकाशित झाल्यानंतर अखेर ‘अरिजित नाइट’च रद्द करण्यात आली.   

नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेच्या संयुक्‍त विद्यमाने येत्या २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान मानकापुरातीरल इनडोअर सभागृहात राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उपराजधानीत पहिल्यांदाच होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू व साइना नेहवालसह देशभरातील सातशेच्या वर बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असतानाच याच सभागृहात संकुल समितीने गाण्याच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन टाकली. त्यामुळे साहजिकच बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजकदेखील दु:खी व नाराज झाले होते. ‘अरिजित नाइट’मुळे सभागृहातील लाखो रुपयांचे महागड्या वूडन कोर्टवर जड सामानांची ने-आण होऊन ते खराब होण्याची दाट शक्‍यता होती. परिणामत: स्पर्धेवर विपरीत परिणाम होऊन शहराची नाहक बदनामी झाली असती. तशी भीती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे व्यक्‍त केली होती. 

मात्र त्याउपरही प्रशासनाने थोड्याशा पैशासाठी गाण्याच्या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. त्यामुळे वूडन कोर्ट खराब होण्यासोबतच बॅडमिंटनपटूही सरावापासून वंचित राहिले असते.  ‘सकाळ’ने ‘राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी गाण्याचा कार्यक्रम!’ अशा आशयाचे वृत्त शनिवारच्या (ता. २१) अंकात प्रसिद्ध केले होते. बातमीनंतर प्रशासनावर चहूकडून जोरदार टीका झाली होती. शेवटी वाढता रोष लक्षात घेता प्रशासनाला हा कार्यक्रमच रद्द करावा लागला. यासंदर्भात क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही अरिजित नाइट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. यासंदर्भात दुसरे कारण देण्यात येत असले तरी, कार्यक्रमाला सर्वत्र होत असलेला तीव्र विरोध, यामागचे खरे कारण असल्याचे समजते.  

इनडोअर सभागृहावर पहिला अधिकार हा खेळाडूंचा आहे. त्यामुळे सभागृहात उपयोग केवळ खेळ आणि खेळाडूंसाठीच व्हायला पाहिजे. या सभागृहात वारंवार अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत रजनी होत राहिल्या तर लवकरच वूडन कोर्टचे तीनतेरा वाजण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पैशाच्या लोभापायी प्रशासनाने खेळाडूंच्या भावनेशी खेळ खेळू नये. हे क्रीडासंकुल असून, तीच शेवटपर्यंत ओळख असायला पाहिजे. 
- मंगेश काशीकर, सचिव, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com