नक्षलग्रस्त गडचिरोली दहावीत अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नागपूर - विकासात सर्वाधिक मागास असलेला नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा दहावीच्या निकालात मात्र नागपूर विभागातून  अव्वल ठरला आहे. येथील 85.49 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल भंडारा आणि नागपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. 

नागपूर - विकासात सर्वाधिक मागास असलेला नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा दहावीच्या निकालात मात्र नागपूर विभागातून  अव्वल ठरला आहे. येथील 85.49 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल भंडारा आणि नागपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी (ता.13) निकाला जाहीर करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत नागपूर विभागाच्या निकालात दीड टक्के घट झाली आहे. विभागाचा सरासरी निकाल 83.67 टक्के लागला. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 85.49 टक्के लागला. दुसऱ्या स्थानावर बारावीत अव्वल असलेल्या भंडारा जिल्हा असून येथील 85.03 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीप्रमाणेच नागपूर जिल्हा तिसऱ्या स्थानावर असून 84.82 टक्के निकाल लागला. 

दहावीची परीक्षा सात मार्च ते एक एप्रिलदरम्यान घेण्यात आली. त्यासाठी एक लाख 75 हजार 694 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी एक लाख 74 हजार 805 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख 46 हजार 257 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. निकालाची टक्केवारी 83.67 टक्के लागला. त्यात 72 हजार 991 विद्यार्थी तर 73 हजार 266 विद्यार्थींनीं उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवारी अनुक्रमे 80.32, 87.30 टक्के आहेत. विभागानिहाय निकालात गडचिरोली 85.49 टक्‍क्‍यासह अव्वल स्थान तर वर्धा जिल्हा 80.12 टक्‍क्‍यासह शेवटल्या स्थानावर राहीला. गुणपत्रिकेचे वाटपाची तारीख अद्याप निश्‍चित झाली नसल्याने त्यासंदर्भात लवकरच तारीखेची घोषणा करण्यात येईल अशी माहिती विभागीय अध्यक्ष संजय गणोरकर यांनी दिली. 

श्रेणी सुधारण्याच्या दोन संधी 
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची टक्केवारी सुधारण्यासाठी श्रेणी तसेच गुणसुधार योगनेंतर्गत पुन्हा एकदा परीक्षेला बसता येणार आहे. मार्चच्या परीक्षेत एकाचवेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये तसेच पुढील वर्षी मार्चमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत श्रेणी-गुण सुधारसाठी 2017 आणि 2018 अशा दोन संधी देण्यात येत आहेत. याशिवाय फेरमूल्यांकनासाठी पाच दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. 

एटीकेटीची सुविधा 
यावर्षीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जास्तीत जास्त दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी एटीकेटीची सुविधा लागू असेल. एटीकेटीच्या सवलतीमुळे अकरावीमध्ये मिळणारा प्रवेश हा तात्पुरता स्वरुपात असेल. अकरावीत शिकत असताना एटीकेटी मिळालेला विषय घेऊन जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये होणारी परीक्षा देता येईल. यामध्येही पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास मार्च 2018 किंवा त्यापुढील परीक्षा देता येईल. मात्र अशा विद्यार्थ्यांचा अकरावीचा निकाल दहावी उत्तीर्ण झाल्यावरच जाहीर करण्यात येईल. 

आजपासून गुणपडताळणीची संधी 
बारावीप्रमाणेच दहावीतही उद्या बुधवारपासून गुणपडताळणी आणि छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी 23 जूनपर्यत संकेतस्थळावरील अर्ज स्वसाक्षांकित प्रतीसह विहित शुल्कासह भरता येईल. छायांकित प्रतीसाठी 3 जुलैपर्यत अर्ज करता येईल. 

विभागनिहाय निकाल 
भंडारा - 85.03, 
चंद्रपूर - 81.60, 
नागपूर - 84.82, 
वर्धा - 80.12, 
गडचिरोली - 85.49, 
गोंदिया - 83.80 
.................. 
एकूण - 83.67 
......... 
मुले - 72 हजार 991- 80.32 टक्के 
मुली - 73 हजार 266 - 87.30 टक्के

Web Title: nagpur news ssc result gadchiroli