तन्वीने उंचावली महापालिकेची मान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नागपूर - वडिलांचे टाइल्स बसविण्याचे काम, घरकाम करून मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणारी आई, अशी पार्श्‍वभूमी असलेल्या तन्वी भीमराव मोरघडेने आव्हानांवर मात करीत ९६.२० टक्के गुण घेतले. सर्वत्र क्‍लासेसची धूम असताना घरीच अभ्यासावर लक्ष केंद्रित करून तन्वीने महापालिका शाळांतून अव्वल स्थान पटकावले.

महापालिका शाळांकडे नेहमीच वाकड्या नजरेने बघितले जाते. परंतु, महापालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जाही खासगी शाळांच्या तुलनेत कमी नसल्याचेच रामदासपेठेतील बॅरिस्टर शेषराव वानखेडे या शाळेतील तन्वीने दाखवून दिले. तन्वी अभ्यासात सर्वसाधारणच होती, असे तिची शिक्षिका ज्योती कोहळे यांनी नमुद केले. तन्वीनेही वर्गात शिकविलेले घरी पुन्हा पुन्हा पाठांतर केल्याचे सांगितले. दहावीत चांगले गुण घेण्याचे तिचे लक्ष्य होते. लक्ष्य ठरवून त्यासाठी प्रयत्न केल्याने यश मिळविल्याचे तन्वीने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तन्वीला चित्रकलेची आवड असून, राज्य स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले होते. एवढेच नव्हे, तर ती टायगर बचाव मोहिमेची ब्रॅंड ॲम्बेसॅडरही होती. तिने विज्ञान विषय घेण्याची इच्छा व्यक्त केली असून, आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

मैत्रीण मोनिकानेही  ९० टक्के पटकावले
तन्वीची वर्गमैत्रीण हिवरीनगर येथील मोनिका सोनीलाल नेवारे ही ९०.८० टक्के गुण घेत आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल केली. मोनिकाला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. मोनिकाचे वडील खासगी संस्थेचे काम करतात, तर आई गृहिणी आहे. मोनिकानेही क्‍लासेसचा आधार घेतला नाही. शाळेतील शिक्षकांनी शिकवले अन्‌ मोनिकाने घरी अभ्यास केला. मोनिकाही अभ्यासात साधारणच होती, असे तिच्या शिक्षिका ज्योती कोहळे यांनी सांगितले.

Web Title: nagpur news ssc result municipal school