एसटीची प्रवाशांना भाऊबीजेची भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नागपूर - न्यायालयाच्या दणक्‍यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप म्यान करावा लागला. चार दिवसांच्या संपानंतर शनिवारी सुरू झालेली बससेवा प्रवाशांसाठी भाऊबीजेची भेट ठरली. ‘लाल परी’ पुन्हा रस्त्यावरून धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असून खासगी बसचालकांनी चालविलेली लूटसुद्धा नियंत्रणात येऊ लागली आहे.

नागपूर - न्यायालयाच्या दणक्‍यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप म्यान करावा लागला. चार दिवसांच्या संपानंतर शनिवारी सुरू झालेली बससेवा प्रवाशांसाठी भाऊबीजेची भेट ठरली. ‘लाल परी’ पुन्हा रस्त्यावरून धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असून खासगी बसचालकांनी चालविलेली लूटसुद्धा नियंत्रणात येऊ लागली आहे.

सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी १६ ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. शुक्रवारी रात्री उशिरा एसटी कामगार संघटनांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. अल्पावधीतच योग्य नियोजन करून शनिवारी पहाटेपासूनच बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. उपराजधानीतील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक येथून पहाटे साडेपाचपासून बसफेऱ्या सोडण्यात आल्या. गणेशपेठ, इमामवाड्यासह सर्वच आगारातून बसेस बाहेर काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक, मोरभवन येथून नियमित बसफेऱ्या सोडण्यात आल्या. यामुळे दिवाळसण आटोपून कामाच्या ठिकाणी परतणारे आणि भाऊरायाला ओवाळणीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भगिनींची चांगलीच सोय झाली. संप मिटल्याची फारशी कुणालाही माहिती नसल्याने सकाळच्या सुमारास प्रवाशांची संख्या फारच कमी होती. यामुळे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवासी कमी होते. या उलट बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसमध्ये चांगलीच गर्दी दिसून आली. दुपारनंतर बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी झालेली दिसली. अगदीच दुर्लक्षित असलेली एसटीचे महत्त्व संपाच्या निमित्ताने अधोरेखित झाल्याची भावना प्रवाशांनी प्रकर्षाने व्यक्त केली. 

आंदोलनाची धग कायम
संपाच्या निमित्ताने एसटी कामगारांच्या सर्वच संघटना सोबत आल्या. उच्च न्यायालयाचा आदर म्हणून कामगार संघटनांनी संप मागे घेतला. पण, आंदोलनाची धग कायम आहे. योग्य वेळेत, योग्य वेतनवाढ न दिल्यास पुन्हा अशाच तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, अशी भावना कामगारांकडून व्यक्त करण्यात आली. 

अडकलेले एसटी बांधव रवाना
संपामुळे बाहेरगावचे चालक-वाहक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. नागपुरातही बाहेरचे सुमारे दीडशे चालक-वाहक चार दिवस अडकून होते. नियोजित फेऱ्या घेऊन आज ते आपापल्या डेपोकडे रवाना झाले. 

पहिल्याच दिवशी तेराशे फेऱ्या
नागपूर विभागातून शनिवारी १ हजार ३०४ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. दुपारी बारापर्यंत ४५१ फेऱ्या रवाना झाल्या. प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्यांची वाढ करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली होती. नागपूर विभागात एकूण ३ हजार १०० एसटी कर्मचारी असून ५७० बसेसच्या मदतीने दररोज सुमारे १,४०० फेऱ्या सोडण्यात येतात.

‘आडवी’ बस हटविण्यासाठी कसरत
संपकाळात बसेस बाहेर जाऊ नयेत यासाठी गणेशपेठ बसस्थानकाच्या गेटवर बस आडवी लावून चाकांमधील हवा सोडण्यात आली होती. आज पहाटेपासूनच बसफेऱ्या सुरू झाल्या. मात्र, आडव्या बसमुळे वाहतुकीला बाधा निर्माण झाली. हवाच नसल्याने ही बस हलविताही येत नव्हती. चार दिवसांपासून अन्य बसेसला अडवून ठेवणारी ही आडवी बस आज क्रेनच्या मदतीने बाजूला हटविण्यात आली.

Web Title: nagpur news st bus