विद्यार्थ्यांनो, यशासाठी ‘रोल मॉडेल’ निवडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

नागपूर - भारताला विश्‍वगुरू बनविण्यासाठी युवाशक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यासाठी तरुणांनी साधे राहणीमान ठेवावे. तसेच झगमगाटाच्या मागे न जाता यशासाठी ‘रोल मॉडेल’ निवडावेत, असे प्रतिपादन तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज येथे केले. 

नागपूर - भारताला विश्‍वगुरू बनविण्यासाठी युवाशक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यासाठी तरुणांनी साधे राहणीमान ठेवावे. तसेच झगमगाटाच्या मागे न जाता यशासाठी ‘रोल मॉडेल’ निवडावेत, असे प्रतिपादन तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज येथे केले. 

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. सिद्धार्थविनायक काणे होते. या वेळी प्र-कुलगुरू प्रा. प्रमोद येवले, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. पुरोहित म्हणाले की, निव्वळ शिक्षणाने काही होणार नाही. बुद्धीची आवश्‍यकता आहे. विद्यापीठाने गेल्या काही वर्षांमध्ये प्रगती केली आहे. तरीही सुधारणेस वाव आहे. देशातील उत्कृष्ट विद्यापीठ बनविण्याचा संकल्प सोडून त्या दिशेने काम पुढे न्यावे. शिक्षणाला चारित्र्याची जोड देणे आवश्‍यक आहे. महात्मा गांधी यांच्या ‘यंग इंडिया’वरील लेखावर प्रकाश टाकताना त्यांनी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना नव्या आव्हानांचा सामना करायचा आहे, याकडे लक्ष वेधले. 

त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. समारंभात चार शाखांमधील १५२ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. तर २०१७ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार ९८० स्नातक आणि १६ हजार २५१ स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या १७२ विद्यार्थ्यांना ३१२ सुवर्णपदके, ४३ रौप्य आणि १०२ पुरस्कारांसह एकूण ४५७ पदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राहुल, सौरभ, सायली रचनाला सर्वाधिक पुरस्कार 
डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील राहुल बजाजला एलएलबी (पाच वर्षीय) परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सर्वाधिक २० पदके व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉमधून एलएलबी (तीन वर्षीय) परीक्षेसाठी सौरभ त्रिवेदीला १३ पदके व पुरस्कार, शासकीय विज्ञान संस्थेच्या बीएस्सी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेणाऱ्या रचना कनोजिया आणि बिंझाणी महिला महाविद्यालयातून बी. ए. परीक्षेत सर्वाधिक गुण पटकाविणाऱ्या सायली पेशवे यांना प्रत्येकी १२ पदके आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 

याशिवाय विद्यापीठाच्या गणित विभागाच्या लिनता डोयेला आठ, शासकीय विज्ञान संस्थेच्या झरीना झोयाला आठ, डॉ. आंबेडकर बिझनेस स्टडीजच्या आकृती चौकसेला आठ, जेएम पटेल कॉलेजच्या भीमा भोयरला नऊ, बिंझाणी कॉलेजच्या स्नेहा लोहीला आठ, विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या पीतांबर सुपारेला ११ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कांचन घाटोळेला चार सुवर्णपदके 
 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५व्या दीक्षान्त समारंभात कांचन कमलाकर घाटोळे हिला ‘फूड ॲण्ड न्यूट्रिशन’ या विषयावर सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल चार सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये मैमुन सुवर्णपदक, प्रोफेसर साबिहा अन्वर वली सुवर्णपदक, ॲडव्हान्स न्यूट्रिशन विषयात सर्वाधिक गुण मिळाविल्याबद्दल मोहसीन अली सुवर्णपदक आणि क्‍लिनिकल ॲण्ड थेरॅप्युटिक्‍स न्यूट्रिशन या विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल सकिना अद्रुल्लाभाई सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. 

कृष्णकुमार बावनकुळेला दोन सुवर्ण 
लोकप्रशासन विभागात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षान्त समारंभात कृष्णकुमार सदाशिव बावनकुळे याला २ सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. यामध्ये राजेवीबाई मंजुनाथ नायक रौप्यमहोत्सवी स्मृती सुवर्णपदक व स्व. आर. के. ऊर्फ दादासाहेब पाटील सुवर्णपदकांचा समावेश आहे. विद्यापीठ परिसरातील लोकप्रशासन विभागातून एम. ए. पूर्ण करणाऱ्या कृष्णकुमारने यशाचे श्रेय आई-वडिलांसह प्राध्यापक व मित्रांना दिले.

Web Title: nagpur news student nagpur university