विद्यार्थ्यांना पाजले शौचालयातील पाणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

नागपूर - जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दोन दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चक्क शौचालयातील नळाचे पाणी पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने आयोजकांचे पितळ उघडे पडले आहे. 

नागपूर - जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दोन दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चक्क शौचालयातील नळाचे पाणी पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने आयोजकांचे पितळ उघडे पडले आहे. 

जिल्हा प्रशासनातर्फे २३ आणि २४ फेब्रुवारीला काटोल मार्गावरील शासकीय माध्यमिक कन्या शाळा येथे प्राथमिक आणि माध्यमिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन सकाळी दहाऐवजी एक वाजता झाले. यादरम्यान पाहुण्यांची वाट बघत विद्यार्थी उपाशीपोटी बसले होते. उद्‌घाटन संपल्यावर जेवणास सुरुवात झाली. त्यामध्ये प्रचंड अव्यवस्था असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. पिण्याच्या पाण्यासाठी बऱ्याच प्रमाणात ‘कॅन’ची व्यवस्था होती. मात्र, त्यात भरण्यात येत असलेले पिण्याचे पाणी देण्यासाठी अगदी शौचालयात असलेल्या नळातून पाइपच्या साहाय्याने भरले जात होते. याबद्दल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित व्यवस्था असलेल्या अधिकाऱ्याला विचारणा केली. 

मात्र, या अधिकाऱ्याने त्यांच्यावरच चवताळून भांडणही केले. त्यामुळे हे अधिकारी तेथून निघून गेले. कशीबशी स्पर्धा सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी अर्ध्यापेक्षा कमी स्पर्धांचे आयोजन करता आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात रात्री अकराला सांघिक नृत्य स्पर्धा सुरू होताच पोलिसांनी ती स्पर्धा बंद केली. तसेच साहित्य जप्त केले. यावेळी तयारी करून आलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना घरी परत जावे लागले. दुसरीकडे निवासी असलेल्या विद्यार्थ्यांना दुपारचे शिळे जेवण दिल्याने शिक्षकांनी विरोध केला. त्यानंतर जेवण तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. प्रशासनाने केलेली राहण्याची व्यवस्थाही अडगळीत होती. संपूर्ण खोल्यांमध्ये अस्वच्छता होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बाहेरून आलेल्या बऱ्याच चमू निघून गेल्या. जे उपस्थित होते, त्यापैकी अनेक विद्यार्थी स्पर्धेदरम्यान बेशुद्ध पडले. मात्र, डॉक्‍टरही येथे उपस्थित नव्हते. त्यामुळे क्रीडा महोत्सवात प्रशासनाचा गलथानपणा दिसून आला. 

सभापतीच्या भावाचे कंत्राट
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाकडून दोन दिवसांच्या जेवणाचे कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट जिल्हा परिषदेतील एका सभापतीच्या भावालाच देण्यात आल्याची माहिती आहे. व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे सर्वच कॅन रिकाम्या होत्या. मात्र, त्यात शौचालयातील नळाचे पाणी भरले जात होते. दुसरीकडे जेवणही निकृष्ट असल्याची तक्रार शिक्षक आणि विद्यार्थ्यांची होती. 

संघटनेची कारवाईची मागणी 
क्रीडा महोत्सवात विद्यार्थी आणि शिक्षकांची बऱ्याच प्रमाणात अव्यवस्था झाली. त्यामुळे काही विद्यार्थी स्पर्धांना मुकले आणि त्यांना शौचालयातील नळाचे पाणी प्यावे लागले. या विरोधात राज्य शिक्षक सेनेचे विभागीय सरचिटणीस टीकाराम कडूकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळाने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली.

Web Title: nagpur news student Toilets water