'सागाच्या बियाण्यांची ऑनलाइन विक्री'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नागपूर - प्रक्रियायुक्त सागवान बियाणे ॲमेझॉनच्या माध्यमातून ऑनलाइनव्दारे जागतिक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा वृक्षलागवड व निसर्ग संवर्धनासाठी उपयोग होणार असून, वनविकास विभागाच्या या प्रयत्नामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नागपूर - प्रक्रियायुक्त सागवान बियाणे ॲमेझॉनच्या माध्यमातून ऑनलाइनव्दारे जागतिक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा वृक्षलागवड व निसर्ग संवर्धनासाठी उपयोग होणार असून, वनविकास विभागाच्या या प्रयत्नामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पेंच व्याघ्रप्रकल्पातील सिल्लारी येथे वनविकास विभागाव्दारे आयोजित ट्रीटेड टीक सीड्‌स ऑनलाइन विक्रीचे उद्‌घाटन झाले. यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंग परदेशी, वनविभागाचे सचिव विकास खारगे, एफ.डी.सी.एम.चे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. भगवान, एफ.डी.सी.एम.चे व्यवस्थापकीय संचालक यू. के. अग्रवाल होते.

राज्य शासनाने यंदा चार कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेत यशस्वी केला. त्यामुळे राज्य वनांच्या वृद्धीसाठी जाणीवपूवर्क प्रयत्न करत आहे. त्याकरिता बियाणे उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही बियाणे विक्रीची ऑनलाइन पद्धत फायदेशीर ठरणार आहे. आजच्या वैश्विकीकरणाच्या युगात घराघरांपर्यंत बियाणे पोहोचवून वनक्षेत्र वाढविण्याचा वनविकास विभागाचा हा प्रयत्न ऑनलाइन बियाणे विक्रीच्या माध्यमातून यशस्वी होईल. जागतिक बाजारपेठेमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी गुणवत्तापूर्ण साग बियाणे संपूर्ण जगात विकले जातील, असा विश्वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

या बियाणांच्या यशस्वी विक्रीनंतर मधुमक्षिकापालन केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामधून मिळणाऱ्या मधाची, तसेच बांबू रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून बांबूपासून पर्यावरणपूरक उत्पादने निर्माण करण्यात येतील. त्या उत्पादनांची भविष्यात ऑनलाइन विक्री करण्यात येईल. या सारख्या नावीन्यपूर्ण योजनाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. वनविभागाने विविध उपक्रम व योजना राबवून उत्पादननिर्मिती करावी. त्याला व्यावसायिक स्वरूप देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लावण्यास मदत होईल, असे वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले. यावेळी इको रिसॉर्टस पुस्तिकेचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते विमोचन करण्यात आले. संचालन वनपरिक्षेत्राधिकारी रेखा गावंडे यांनी, तर प्रास्ताविक वनविकास विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यू. के. अग्रवाल यांनी केले. आभार महाव्यवस्थापक यशवीर सिंग यांनी मानले.

Web Title: nagpur news Sudhir Mungantiwar Sale of saga seeds online