सुनील हायटेकने थकविले मजुरांचे वेतन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नागपूर - अभियांत्रिकी तसेच प्रकल्प उभारणी, वीज निर्मितीशी निगडित उपकरणे तयार करणाऱ्या सुनील हायटेकने दोन वर्षांपासून कंत्राटी मजुरांचे वेतन थकीत ठेवल्याचा मुद्दा  निदर्शनास आला. प्रकल्पाच्या पूर्णत्वास दोन वर्षांचा कालावधी लोटूनही मजुरांना वेतनासाठी हेलपाटे घालायला लावणाऱ्या कंपनीविरुद्ध मंगळवारी (ता. २४) बीईंग युनायटेड या मजूर संघटनेच्या नेतृत्वात रामदासपेठेतील कॉर्पोरेट कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

तेलंगण तसेच ओडिशामधील चंपा येथे दोन प्रकल्पांचे काम सुनील हायटेककडे होते. या दोन प्रकल्पांसाठी लागणाऱ्या मजुरांचे कंत्राट तीन कंत्राटदारांना देण्यात आले. यात सिकंदर शेख, इंतजूल हक आणि शुलीबिबी यांचा समावेश आहे. या तिघांनी वेगवेगळ्या राज्यातून कंत्राटी मजुरांचा पुरवठा केला. प्रकल्प पूर्ण होईस्तोवर वेतनाची थोडी फार रक्कम मजुरांना देण्यात  आली. मात्र, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एकही रुपया मजुरांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना  दिलेला नाही. यामुळे मजुरांचे वेतन होऊ शकले नाही. आजघडीला तीनही कंत्राटदारांचे मिळून एकूण ३६ लाख रुपये वेतन थकबाकी सुनील हायटेकला देणे आहे. प्रकल्प पूर्ण होऊन दीड वर्षाचा काळ लोटला. परंतु, अद्याप मेहनतीचे पैसे न मिळाल्याने मंगळवारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले. या वेळी ‘सुनील हायटेक  हाय हाय’च्या घोषणा देण्यात आल्या. 

‘सुनील हायटेक’ सुनील गुट्टे यांची कंपनी आहे. सुनील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांचे चिरंजीव आहेत. यापूर्वी उत्पन्न कमी दाखवून मोठ्या प्रमाणात आयकर चुकवल्याच्या संशयावरून सुनील हायटेकवर आयकर छापे टाकण्यात आले होते. यानंतर प्रकाशात आलेला मजुरांच्या वेतन थकबाकीचा प्रश्‍न कंपनीची प्रतिष्ठा पणाला लावणारा ठरत आहे. 

मजुरांना लावले हाकलून
प्रकल्प पूर्ण झाल्यापासून अनेकदा मजुरांनी वेतनासाठी कंत्राटदार आणि कंपनीकडे पाठपुरावा केला. कंपनीने कंत्राटदाराला पैसे न दिल्यामुळे त्याने हात वर केले. परिणामत: मजुरांनी सुनील हायटेकमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना कार्यालयाबाहेरून हाकलून लावण्यात आले. यामुळे मजुरांनी दिल्ली येथील मजूर संघटना असलेल्या बीईंग युनायटेडशी संपर्क साधून मंगळवारी आंदोलन केले.

मजुरांच्या प्रश्‍नांसाठी संघटना सदैव कार्यरत आहे. वेतन देण्यासाठी कंपनीला काही दिवसांची  मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालयीन लढाई लढण्यात येईल. 
वैभव गुप्ता पदाधिकारी, बीईंग युनायटेड

Web Title: nagpur news Sunil Hitek Company Labor wages issue