'सुपर' गैरसोयींचे सुपर स्पेशालिटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

नागपूर - वैद्यकीय सेवांचा दर्जा उंचाविण्याच्या प्रयत्नांचे ढोल केंद्र आणि राज्य सरकारतर्फे बडविले जात असताना नागपूर, अमरावती आणि नाशिक या शहरांमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अर्धवट क्षमतेने कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने साडेतीनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी तयार करण्याचा संकल्प 25 वर्षांपूर्वी सोडला. आजदेखील ते 180 खाटांवरच आहे. नाशिकचे सुपर स्पेशालिटी तर अवघ्या 90 खाटांचे आहे. कॅन्सरच्या किरकोळ शस्त्रक्रिया, ऍन्जिओप्लास्टी आणि डायलिसिस यांच्यापलीकडे या रुग्णालयांचा विकास झालेला नाही. अमरावतीच्या "सुपर स्पेशालिटी'साठी खाटांची संख्याच ठरलेली नाही. नागपुरात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या संचालनालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. अमरावती आणि नाशिकचे सुपर स्पेशालिटी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहे.

मध्य भारतासाठी नागपूर
"मेडिकल'शी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दिवसाकाठी दीड हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. हृदयविकार, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, न्युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, सीव्हीटीएस अशा अनेक आजारांवर "सुपर' वरदान ठरत आहे. परंतु, गर्दी वाढल्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्य रुग्णालयासारखी सेवा देत आहे.

नागपुरात किडनी प्रत्यारोपण सुरू झाले, ही भूषणावह बाब आहे. परंतु, सीव्हीटीएस विभागात हृदयविकाराच्या शस्त्रक्रियांची "वेटिंग लिस्ट' कृत्रिमरीत्या वाढविण्यात येते. यावर उपाय म्हणून येथील डॉक्‍टरांनी वेगळीच शक्कल लढविली. खासगी रुग्णालयात "रेफर' करून तेथे लगेच शस्त्रक्रिया करण्याचे अफलातून प्रयोग सुरू झाले. "सुपर'मध्ये "बायपास'ची सोय असताना खासगी रुग्णालयात हलवण्यामागच्या अर्थकारणाची चर्चा सुरू आहे. "महात्मा फुले जन आरोग्य'अंतर्गत मंजूर निधीसह अतिरिक्त पैसे देऊन शस्त्रक्रियेचे बिल अदा केले जाते, हा सारा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला.

नागपूरच्या सुपर स्पेशालिटीत उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या नातेवाइकांसाठी साधा निवारादेखील बांधला गेला नाही. रुग्ण भरती असताना नातेवाईक परिसरातच दिवसच काय रात्रदेखील काढतात. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत सर्व काही विटा-दगडांची चूल मांडून थाटलेल्या संसारात होत असते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांची राहुटी "सुपर' परिसरात सतत असते.

बांधकामाचा "अर्थ'नामा
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील "ए-विंग'चे बांधकाम साडेचार वर्षांपासून रखडलेले आहे. त्यासाठी मंजूर 6 कोटी 52 लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे "मेडिकल' प्रशासनाने वळता केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने कामच सुरू केलेले नाही आणि बांधकाम वेळेत सुरू झाले नसल्याने नियमांवर बोट ठेवत बांधकामाच्या निधीत वाढ करण्याची शक्कल लढविली जाते. यानंतर नव्याने आराखडा तयार करण्यात आला. बांधकाम निधीत दुपटीपेक्षा अधिक वाढ करण्यात आली. तब्बल 13 कोटींच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी वर्षभरापूर्वी मिळाली. तरीही बांधकामाचा नारळ फुटलेला नाही.

"रक्तघटक' उसनवारीवर
सुपर स्पेशालिटीत डॉ. मनीष श्रीगिरीवार विशेष कार्य अधिकारी असताना "रक्त विघटन प्रकल्प' तयार करण्याची योजना आखली. ती मंजूर झाली. त्यांच्या बदलीसोबत प्रकल्प थंडबस्त्यात गेला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकल्प त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाही त्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागासह स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. "मेडिकल'मधून उसनवारीवर "रक्तघटक' आणले जातात.

अमरावतीत डॉक्‍टरच नाहीत
देशाला राष्ट्रपती देणाऱ्या अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय नाही. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाचे "सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल' वर्षभरापूर्वी उभारण्यात आले.

कोट्यवधी खर्चून इमारत झाली. दुसऱ्या टप्प्यातील इमारतही तयार आहे. हे सारे शोभेची वास्तू ठरत आहे. पदस्थापनेचा प्रस्तावही मंत्रालयात गेला; परंतु पदभरती झालेली नाही. यंत्रसामग्रीचा प्रस्ताव मंजूर, पण यंत्रे पोचलेली नाहीत. दुसऱ्या टप्प्यातील सुसज्ज इमारत तयार आहे. मात्र विद्युतीकरणाचे कारण पुढे करत अधिकारी वेळ मारून नेत आहेत. किडनी, हृदय, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया माफक दरात व्हाव्यात, या उद्देशाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप ही इमारत रुग्णालय प्रशासनाकडे हस्तांतरित झालेली नाही. मुदत संपल्यानंतरही इमारतीचे काम प्रलंबितच आहे.

"रेफर टू नागपूर'
कर्करोग उपचार आणि शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारावर उपचार व शस्त्रक्रिया आणि हृदयरोग उपचार व शस्त्रक्रिया अशा गंभीर आजारांवर सुपर स्पेशालिटीत उपचार व शस्त्रक्रिया व्हाव्यात असे नमूद आहे. मात्र, डॉक्‍टरच नसल्यामुळे अमरावती येथील गंभीर रुग्णांना नागपूरला "रेफर' करण्यात येते. विशेष असे की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अजूनही इमारत हस्तांतरित झालेली नाही. त्याचा युद्धपातळीवर पाठपुरावा सुरू आहे. मनुष्यबळासंदर्भात प्रस्ताव पाठविला असल्याने लवकरच रुग्णालय कार्यान्वित होईल, असा विश्‍वास सुपर स्पेशालिटीचे अधीक्षक डॉ. सुरेश शिरसाट यांनी व्यक्त केला.

नाशिकला विस्तारीकरणाचे वेध
नाशिक शहरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. परंतु, सरकारचे एकही वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने शालीमार चौकाजवळ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. या सुपर स्पेशालिटीत एन्जिओग्राफी, एजिन्ओप्लास्टी, बायपास, तसेच कॅन्सरवरील शस्त्रक्रिया आणि डायलिसिस आणि संबंधित शस्त्रक्रियांपलीकडे फारसे काही होत नाही. सुपर स्पेशालिटीचा विस्तार करण्यात सार्वजनिक आरोग्य विभाग नापास झाला आहे.

Web Title: nagpur news super speciality hospital issue