बहुप्रतीक्षित सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटन दृष्टिपथात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नागपूर - नागपुरातील बहुप्रतीक्षित आणि भव्य अशा सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटन दृष्टिपथात असून, रविवारी (ता. १३) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी (ता. ३) सभागृहाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह भेट दिल्याचे कळते.

रेशीमबाग मैदानावर असलेले हे डौलदार सभागृह नागपूरचे वैभव वाढविणार आहे. अनेक दिवसांपासून सभागृहाचे काम सुरू आहे. मधल्या काळात अतिशय संथगतीने काम झाल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ लागला. मात्र, दीड वर्षामध्ये अतिशय झपाट्याने सभागृहाचे  काम झाले आणि आता काही किरकोळ बाबी सोडल्या, तर उद्‌घाटनासाठी सभागृह पूर्णपणे सज्ज झाले आहे.

ऑगस्टमध्ये सभागृहाचे उद्‌घाटन झाल्यावरच महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा मुहूर्त निघणार, असे ठरले होते. १३ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत स्मार्ट ॲण्ड सेफ सिटीअंतर्गत होऊ घातलेल्या कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरचे भूमिपूजन तसेच मेट्रो रेल्वेची जमिनीवरील ट्रॅकवर चाचणी हे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे त्याचदिवशी सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन महानगरपालिका करीत आहे. तारखेची घोषणा झालेली नसली तरी लवकरच यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे कळते.

महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके, महापालिकेचे आयुक्त अश्‍विन मुद्‌गल, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर दिवारी आदींनी सभागृहाच्या कामाची पाहणी केली.

Web Title: nagpur news Suresh Bhat Auditorium