उधारी न फेडल्याने शस्त्रक्रिया थांबल्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नागपूर - महात्मा फुले जनआरोग्य अभियान अर्थात राजीव गांधी जीवनदायी योजना गरिबांसाठी वरदान ठरत असतानाच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासनाने कंत्राटदाराची उधारी अदा न केल्याने सर्जिकल साहित्याचा पुरवठा थांबवला आहे. यामुळे या योजनेतून होणाऱ्या शस्त्रक्रियांना थांबा लागला आहे. 

नागपूर - महात्मा फुले जनआरोग्य अभियान अर्थात राजीव गांधी जीवनदायी योजना गरिबांसाठी वरदान ठरत असतानाच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासनाने कंत्राटदाराची उधारी अदा न केल्याने सर्जिकल साहित्याचा पुरवठा थांबवला आहे. यामुळे या योजनेतून होणाऱ्या शस्त्रक्रियांना थांबा लागला आहे. 

मेयोच्या वॉर्ड क्रमांक ३३ आणि ३५ मध्ये अस्थिव्यंग असलेल्या पन्नासच्या वर रुग्णांवर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज आहे. या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य अभियानाअंतर्गत पैसे मंजूर झाले आहेत. मात्र, मेयो प्रशासनाने पुरवठादारांची २०१६ पासून तर मे २०१७ पर्यंतची थकबाकी अदा केली नाही. यामुळे या पुरवठादारांनी सर्जिकल साहित्य तसेच औषधांचा पुरवठा थांबवला आहे. 

गेल्या महिनाभरापासून या वॉर्डामधील रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात मंगळवारी मेयो प्रशासन आणि पुरवठादार यांची बैठक झाली; परंतु ती निष्फळ ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुरवठादारांनी थकबाकी दिल्यानंतरच सर्जिकल साहित्य पुरवठा करणार असे धोरण स्वीकारल्याने शस्त्रक्रिया होऊ शकल्या नाही. विशेष असे की, यासंदर्भात वैद्यकीय संचालक कार्यालयाला माहिती नसल्याची चर्चा मेयोत आहे.  

जीएसटी कारणीभूत 
कंत्राटदार तसेच पुरवठादारांची थकबाकी मंजूर न होण्यामागे जीएसटी कारण असल्याचा बनाव मेयो प्रशासनाने केला. जीएसटी लागू करण्यात आल्याने काही औषधे तसेच सर्जिकल  साहित्याच्या किमतीत वाढ झाली. वाढीव दराने साहित्य खरेदी करावे लागत आहे. परंतु, मेयो प्रशासनाला वाढीव दर मान्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मेयो प्रशासन आणि पुरवठादार यांच्यातील वादाचा फटका रुग्णांना बसत आहे. 

अधिष्ठाता नसल्याने घोळ
दोन वर्षांपूर्वी मेयोला कायम अधिष्ठाता म्हणून डॉ. प्रकाश वाकोडे मिळाले होते. त्यांच्या नियुक्तीनंतर मेयोच्या विकासाला वेग आला होता. परंतु, हा वेग त्यांच्या बदलीनंतर मंदावला. वैद्यकीय सहसंचालक पदावर मुंबईला गेले आणि विकासाची गती थांबली. डॉ. मीनाक्षी वाहणे आल्या. यानंतर मेयोचा भार प्रभारावरच सुरू आहे. कायमस्वरूपी अधिष्ठाता नसल्यामुळे मेयोत अर्थकारणासंदर्भात पुढाकार घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न कोणीच करीत नाही, अशी चर्चा मेयोत आहे.

Web Title: nagpur news Surgery