पावसाळी वनपर्यटनावर बुधवारी निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नागपूर - ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व पेंच व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून पर्यटकांसाठी बंद होण्याचे संकेत आहेत. त्यावर १४ जून रोजी होणाऱ्या टायगर फाउंडेशनच्या बैठकीत शिक्कामोर्बत होईल.

नागपूर - ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व पेंच व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून पर्यटकांसाठी बंद होण्याचे संकेत आहेत. त्यावर १४ जून रोजी होणाऱ्या टायगर फाउंडेशनच्या बैठकीत शिक्कामोर्बत होईल.

देशभरातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात बंद राहत असल्यामुळे पर्यटकांचा जंगलाकडील ओढा वाढलेला आहे. जवळपास सर्वच अभयारण्यातील ऑनलाइन बुकिंग ३० जूनपर्यंत फुल्ल आहेत. पावसाळ्यात जंगलातील जैवविविधतेला वाहनांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. वनमजुरांनादेखील गस्त घालणे कठीण जाते. लहान जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता असते. विशेष करून वन्यजीवांच्या प्रजननाचा हा कालावधी असतो. या कालावधीत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठीसुद्धा अभयारण्ये बंद ठेवली जातात.

मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी पावसाने हवी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे वनविभागाकडून अजूनपर्यंत व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील प्रवेशबंदीचे आदेश काढण्यात आले नाहीत. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच व्याघ्रप्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे देशी पर्यटकांइतकाच विदेशी पर्यटकांचाही कल वाढला आहे. ताडोबासह पेंच, नागझिरा-नवेगाव, बोर या अभयारण्यालासुद्धा पर्यटकांची तेवढीच पसंती आहे.

ताडोबा-अंधारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकांनी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशाचे पालन करून व्याघ्रप्रकल्पात पावसाळी पर्यटन बंद करावे, असे पत्र  प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाला पाठविले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकांनी डांबरी रस्त्यावरील पर्यटन सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. मेळघाटमधून राज्य महामार्गच जात असल्याने तेथील बंद करण्याचा प्रश्‍नच येत नाही. मात्र, उर्वरित बोर, मानसिंगदेव, टिपेश्‍वर, पैनगंगा आदी अभयारण्यांतील पर्यटन रस्ते खराब असल्याने बंद करावे असा प्रस्ताव आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी अद्याप पावसाळ्यातील पर्यटन सुरू ठेवायचे  की, नाही याचा निर्णय घेतलेला नाही.

तीन महिने बंदी
इतर वन्यजीवांसह वाघांच्याही सहज होणाऱ्या दर्शनामुळे देशविदेशातील पर्यटक विदर्भाकडे  वळत आहे. मात्र, पावसाळ्यात पर्यटकांचा वने आणि वन्यजीवांना त्रास होऊ नये म्हणून किमान तीन महिने अभयारण्यात पर्यटकांना बंदी घातली जाते. देशातील सोळा राज्यांत असलेल्या व्याघ्र प्रकल्पातून केवळ पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात पर्यटकांसाठी खुला  राहात होता. मात्र, अलीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंशत: बंद ठेवण्यात येतो. पेंच व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात येत होता.

Web Title: nagpur news tadoba Rainy Forest Tourism