कर निरीक्षकासह तिघांना केले निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

नागपूर - मालमत्ता कर देयकाच्या रकमेत परस्पर घट करून मनपाच्या उत्पन्नालाच सुरुंग लावणाऱ्या कर निरीक्षक व कनिष्ठ कर निरीक्षकाला मंगळवारी (ता. ९) निलंबित करण्यात आले. दोघांसह अग्निशमन विभागातील वादग्रस्त सक्करदरा अग्निशमन केंद्राचे प्रभारी स्थानाधिकाऱ्यावरही मनपा प्रशासनाने शिस्तभंग केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली.

एकीकडे महापालिका उत्पन्नासाठी सर्वच उपाय करीत आहे. त्याचवेळी कर विभागातील अधिकाराच्या कामगिरीमुळे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार माजी महापौर प्रवीण दटके यांनी मागील सभागृहात उघडकीस आणला होता. हनुमाननगरमधील कर निरीक्षक सचिन मेश्राम यांनी सहायक आयुक्तांच्या लॅपटॉपवरील पासवर्डचा गैरवापर करून ५० हजारांच्या देयकाचे ४  हजारांत तडजोड करून देत महापालिकेचे उत्पन्न बुडविल्याचे दटके यांनी सांगितले होते. सहायक आयुक्तांच्या पासवर्डवर कर्मचारी घोटाळे करीत असल्याचे नमूद करीत त्यामुळेच सायबरटेकसारख्या कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली होती. याप्रकरणी दखल घेत प्रशासनाने सचिन मेश्राम यांना निलंबित केले. मेश्राम यांच्यासह नेहरूनगर झोनमधील कनिष्ठ कर निरीक्षक जवाहर घोंगडे यांनाही अशाच एका प्रकरणात निलंबित केले. अग्निशमन विभागातील सक्करदरा अग्निशमन केंद्राचे प्रभारी स्थानाधिकारी व्ही. आर. वंजारी यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. ते ड्यूटीवर मद्यप्राशन करून असतात, अशाही तक्रारी होत्या. त्यांच्यावरही शिस्तभंगाचा ठपका ठेवत प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. 

एकाच दिवशी तीन अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने महापालिका कर्मचाऱ्यांत खळबळ माजली आहे.

Web Title: nagpur news three suspend in nagpur municipal