तासाला ७० वाहनधारकांकडून नियम धाब्यावर 

तासाला ७० वाहनधारकांकडून नियम धाब्यावर 

नागपूर - शहर स्मार्ट होत असून वाहनधारकांच्या बेजबाबदारीला आळा घालण्यासाठी चौकांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, त्यापेक्षाही वाहतुकीचे नियम गुंडाळून वाहने चालविणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. शहरात गेल्या सहा महिन्यांत  तासाला ७० वाहनचालकांनी नियमांची ऐशीतैशी केली. मागील वर्षीच्या तुलनेत या आकडेवारीत भर पडली असून कारवाईनंतरही वाहनधारकांत सुधारणेचे चिन्ह नसल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले आहे. 

शहरात ठिकठिकाणी सिमेंट रोड, मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक रोडवर, चौकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळून स्वतःचा जीव वाचविण्याबाबतचे फलक लावण्यात आले आहे. मात्र, हे फलकांचा नागपूरकरांवरही काहीही एक परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. वाहतूक पोलिसांचाही धाक राहिला नसल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागील वर्षी २०१६ मध्ये ५ लाख १५ हजार ३७० वाहनधारकांनी नियमाला हरताळ फासला. अर्थात दर तासाला ५८ वाहनधारकांकडून नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना वाहतूक विभागाने माहिती अधिकारात दिली. या माहितीतून गेल्या सहा महिन्यांत जानेवारी ते जूनपर्यंत शहरात ३ लाख ३ हजार ७५५ वाहनचालकांवर वाहतूक नियम मोडीत काढल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. अर्थात दर तासाला ७० वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडित काढून कारवाईलाच वाकुल्या दाखवित असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे शहरात गेल्या सहा महिन्यांत ६१८ अपघात झाले. दररोज होणारे अपघात, त्यातून एखाद्याचा मृत्यू होणे या घटनांवरूनही वाहनधारक धडा घेत नसल्याचेच यानिमित्त अधोरेखित झाले. वाहतूक नियमांची पायमल्ली करण्यात महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहेच. शिवाय सुज्ञ नागरिकही मागे नसल्याचे चित्र आहे. वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिस कारवाई करतात, मात्र, त्याचा परिणाम होत नसल्याचेही दरवर्षी नियम मोडीत काढणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.

हजारोंकडे वाहतूक परवान्याचा अभाव 
वाहतूक परवाना नसतानाही बेधडकपणे वाहन चालविणारेही शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या सहा महिन्यांत वाहतूक परवाना नसलेल्या २२०२ जणांवर कारवाई करण्यात आली. मागील  संपूर्ण वर्षात २६७८ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहन परवाना नसतानाही वाहने चालविणाऱ्यांच्या संख्येत यंदा भर पडली आहे.

वाहतूक विभाग कोट्यधीश 
जानेवारी ते जून या सहा महिन्यांत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांकडून वाहतूक विभागाने ५ कोटी ८२ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला. मागील वर्षी ७ कोटी ९३ लाख  ९९ हजारांचा दंड वसूल केला होता. अर्थात गेल्या सहा महिन्यांत दंडाची रक्कम वाढली आहे. दंड आकारल्यानंतरही विशेष परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com