कोट्यवधी खर्चूनही ट्रॉमा अर्धवटच

कोट्यवधी खर्चूनही ट्रॉमा अर्धवटच

नागपूर - रस्ते अपघातांमध्ये गंभीर जखमींना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणताना ट्रॉमा केअर विभागाची (अपघात) भूमिका अत्यंत मोलाची असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोट्यवधी रुपये खर्चून ट्रॉमा युनिट उभारले खरे, परंतु  दुर्दैवाने मेडिकलमधील ट्रॉमा केअर अद्याप अर्धवट आहे. येथे रक्त संकलन केंद्रासह स्टरलायझेशन युनिट उभारले नाही. ट्रॉमामध्ये महत्त्वाची भूमिका असलेले ‘व्हॅस्कुलर सर्जन’ नसल्याची माहिती पुढे आली आहे.  

ज्या व्यक्तीचा अपघात झाला, त्याचा एक एक मिनिट महत्त्वाचा असतो. प्रसंगी वरवर जखमा दिसत नसल्या तरी शरीरातील अंतर्गत अवयवांना जखमा होऊ शकतात. त्यामुळे रुग्ण मृत्यूच्या दारात जाऊ शकतो. ज्याच्यासोबत अपघाताचा प्रसंग घडला, त्याची काळजी घेताना एक्‍सरे, सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफीसारखे निदान तंत्र एकाच छताखाली असावे. अंतर्गत अवयवांना क्षती झाली की नाही, झाली असेल तर त्याचे स्वरूप काय, यावरून उपचार दिशा ठरविण्यासाठी एकाच ठिकाणी काम व्हावे. परंतु, ट्रॉमा युनिटमध्ये एमआरआय नाही. याशिवाय विभागनिहाय खाटा लावल्या आहेत. 

जखमी अवस्थेत ट्रॉमामध्ये उपचारासाठी येणारा रुग्ण कोणत्याही विभागाचा नाही, तर त्याला ट्रॉमात एकाच छत्राखाली उपचार मिळावे. परंतु, तसे चित्र मेडिकलच्या ट्रॉमामध्ये दिसत नाही. कॅज्युल्टीमधून रुग्णाला ट्रॉमात हलविण्यात येते, हेच मुळात चुकीचे व्यवस्थापन सुरू असल्याची जोरदार चर्चा येथे आहे.  

मेडिकलच्या ट्रॉमामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील अनेक रुग्णांवर गंभीर शस्त्रक्रिया झाल्या. विशेष असे की, मेंदूमृताचे हृदय आणि यकृतदानासाठी पुणे, चेन्नईला येथूनच पाठवण्यात आले. साठ खाटांच्या ट्रॉमात आधुनिक यंत्र आहेत. एकाच छत्राखाली उपचार होतात. मात्र, अपघाती रुग्णांसाठी थेट ट्रॉमामध्ये दाखल करायचे असल्यास स्वतंत्र अपघात विभाग सुरू करण्यात येईल. शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. 
डॉ. अभिमन्यू निसवाडे,  अधिष्ठाता, मेडिकल.

ट्रॉमात गंभीर सर्जरी यशस्वी   
मेडिकलचा ड्रीम प्रोजेक्‍ट म्हणून ट्रॉमा युनिट उभारले. बांधकामासह इतर कामांसाठी २२  कोटींसह सीटीस्कॅन, सोनोग्राफी, डीएसआर, एक्‍स रे तसेच इतरही अत्याधुनिक यंत्रांवर सुमारे पन्नास कोटी खर्च झाले. पन्नास कोटी खर्चानंतर अद्यापही मुख्य रस्त्यावरून ट्रॉमाचे प्रवेशद्वार  सुरू झाले नाही. मात्र, या वर्षभरात सर्जरी विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांनी हृदयातून चाकू काढण्याची केलेल्या शस्त्रक्रियेसह आतापर्यंत ८०० वर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या. अनेकांचे जीव वाचवण्यात आले, हे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासह डॉ. राज गजभिये, डॉ. सजल मित्रा यांच्यासह अनेकांचे यश आहे. मात्र, ट्रॉमा युनिटची मूळ  संकल्पना आकाराला यावी, एवढेच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com