डाळीने केला शेतकऱ्यांचा ‘भेजाफ्राय’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

निसर्गाने साथ दिल्याने यंदा सर्वच धान्यांचे उत्पादन वाढले. त्यातही कडधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यामुळे कच्चा माल स्वस्त आणि मुबलक उपलब्ध होत आहे. तसेच आयात होणाऱ्या डाळींचे दरही यंदा माफक आहेत. त्याचा एकूण परिणाम डाळींचे दर घटण्यावर झालेला आहे.
- प्रताप मोटवानी, सचिव, होलसेल ग्रेन मर्चंट असोसिएशन.

दीडशे रुपयांची तूरडाळ ६५ रुपये किलोवर; दर आणखी घसरण्याची शक्‍यता
नागपूर - मागील वर्षी प्रचंड भाव खाल्ल्याने अनेकांच्या ताटातून वरण गायब झाले होते. यंदा उलट स्थिती आहे. तूर आणि हरभरा डाळीचे भाव प्रचंड घसरल्याने शेतकऱ्यांचा ‘भेजाफ्राय’ झाला आहे. मागील वर्षी दीडशे रुपये किलोने विकली जाणारी तूरडाळ आता ६५ रुपये किलोने मिळत आहे.

उत्पादनातील वाढ आणि आयातीमुळे दर आणखी घसरण्याची शक्‍यता आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्‍ती खूश असली, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. डाळीच्या घटत्या दराचा परिणाम नवीन हंगामाच्या तूर आणि हरभरा डाळीवर झाला आहे. व्यापाऱ्यांकडून खुल्या बाजारात तूर आणि हरभऱ्याची किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. दहा वर्षांपूर्वीचे भाव डाळींना मिळत आहेत.

सततचा दुष्काळ, साठेबाजीमुळे दोन वर्षांत डाळीच्या दराने उच्चांक गाठला होता. तूरडाळ १८० रुपयांपर्यंत पोहोचली होती. मॉलपेक्षा धान्य दुकानात ती महाग होती. राज्य शासनाच्या नियोजनावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. शासनाला कमी दरात डाळ वितरण केंद्र उघडावे लागले होते. मात्र, यंदा स्थिती पूर्णत: बदलली आहे.

मुंबई बंदरावर आयाती हरभरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे एका महिन्यापूर्वी पाच हजार रुपयांवर असलेला हरभरा ३,८०० रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. गेल्या वर्षी ९७.९० लाख हेक्‍टरमध्ये हरभऱ्याची लागवड केली होती. मागणीपेक्षा उत्पादन कमी असल्याने भाव कडाडले होते. यंदा १०५.६० लाख हेक्‍टरवर हरभऱ्याची लागवड झाली असून, हवामानही चांगले आहे. परिणामी, उत्पादन ३० टक्के वाढण्याची शक्‍यता आहे. विदेशातूनही हरभऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यामुळेच भावात घसरण झाली. 

दरही निम्म्यावर
दिवाळीपूर्वी ९० रुपये किलो असलेली तूरडाळ आज जेमतेम भावाने विकली जात आहे. मूग, उडीद आणि चणा (हरभरा) डाळीचे दरही निम्म्यावर आले आहेत. हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत चार हजार रुपयांच्या खाली आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील बाजारात नवीन हरभऱ्याची आवक सुरू आहे. काही ठिकाणी हरभरा अद्याप शेतात आहे. चणाडाळीचे दर घसरल्याने हरभऱ्याला व्यापारी आधारभूत किंमतच नव्हे, तर सध्याच्या किमतीपेक्षा कमी देतील, हे स्पष्ट आहे.

Web Title: nagpur news turdal rate decrease