टचस्क्रीनमुळे मोठ्या पडद्याचे हाल!

टचस्क्रीनमुळे मोठ्या पडद्याचे हाल!

नागपूर - एकेकाळी पडद्यावरच्या भव्य दृश्‍यांना भाळणाऱ्या प्रेक्षकांनी आता मनोरंजनासाठी ‘टच स्क्रीन’चा आधार घेतला आहे. या इंटरनेट क्रांतीने नागपुरातील सिंगल स्क्रीन सिनेमागृहांना ताळे लावले. गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल नऊ सिनेमागृहांचा ‘शो’ कायमचा बंद पडला, तर काहींची सातत्याने ‘फ्लॉप’ मालिका सुरू आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये ‘सिंगल स्क्रीन’पेक्षा मल्टिप्लेक्‍सची संख्या जास्त झाली, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नसेल. नागपूर शहराचा जवळपास प्रत्येक भाग सिनेमागृहांनी व्यापला होता. महाल, सीताबर्डीसारख्या भागांमध्ये तर आजूबाजूलाच सिनेमागृहे आहेत. मात्र, जवळपास १५ वर्षांपूर्वी डिजिटायझेशन आले आणि ‘रिल’ उतरली. हा बदल ज्या सिनेमागृहांनी स्वीकारला, ते आजही टिकून आहेत. मात्र, काही काळाच्या ओघात मागे पडले. चित्रा, भरत, अमरदीप, नटराज, रिगल, नरसिंग, रिजंट या चित्रपटगृहांना डिजिटायझेशनसोबत सिनेमाच्या बदलत्या अर्थकारणाचाही फटका बसला. 

नागपूर शहराच्या मध्यभागी असलेली आणखी तीन सिनेमागृहे ऑक्‍सिजनवर आहेत. एकतर चित्रपट उद्योगातील मोठ्या कंपन्यांना शरण जाणे किंवा ताळे लावून घरी बसणे हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. नागपुरातील तीन मोठ्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहांचे रूपांतर ‘डबल स्क्रीन’मध्ये झाल्यामुळे त्यांना अच्छे दिन आले. आता सद्यस्थितीत शहराच्या सर्वच भागांमध्ये मल्टिप्लेक्‍स असून आणखी चार बड्या कंपन्यांचे मल्टिप्लेक्‍स वेटिंगवर आहेत. 

वर्षभरातून एक-दोन अपवाद वगळले, तर आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघावे, असे सिनेमे येत नाहीत. अधेमधे काही आलेच, तर आठवड्यातून तीनच दिवस चालतात. बसल्या जागी मोबाईलवर सिनेमा बघण्याचे फॅड आल्यामुळे व्यवसायावरही खूप परिणाम झाला आहे. 
-राजा लहरिया,  व्यवस्थापक, पंचशील थिएटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com