मावसभावानेच केला वंशचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

दोरीवरून लागला छडा...
सोनेगाव तलावाच्या काठावर वंशचा पोत्यात भरलेला मृतदेह आढळून येताच परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली. मृतदेह कुजलेला असल्याने त्याची ओळख सहजासहजी पटत नव्हती. दरम्यान, आरोपी मुलाचे वडील व मृत वंशचे काका घटनास्थळी आले. त्यांनी पोत्यात आढळून आलेली दोरी ही माझ्या घरच्या गाईला बांधण्याची असल्याची तसेच पोतेही माझ्याच घरचे असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी लगेच त्यांच्या १७ वर्षीय मुलाला संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हे प्रकरण गुन्हे शाखेचे प्रमुख संभाजी कदम यांच्या पथकातील निरीक्षक संदीप भोसले, भारत क्षीरसागर, गोरख कुंभार, विक्रांत सगणे, किरण चौगुले, मनीष वाकोडे, प्रदीप अतुलकर यांनी उघडकीस आणले.

नागपूर - गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेला नऊ वर्षांचा चिमुकला वंश ओमप्रकाश यादव याचा आज अखेर मृतदेहच आढळला. क्षुल्लक वादातून मावसभावानेच वंशचा गळा आवळून खून केला. मृतदेह पोत्यात टाकून सोनेगाव तलावात टाकण्यात आला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश यादव हे पत्नी गौरी, मुलगी वंशिका आणि मुलगा वंशसह खामला जुनी वस्तीत राहतात. त्यांच्याकडे चार ते पाच गाई-म्हशी असून दुधाचा व्यवसाय करतात.

आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे ओमप्रकाश यांच्यासह पत्नी गौरीही दूध वाटपासाठी घरोघरी फिरतात. वंशिका ही सहाव्या वर्गात तर वंश हा खामल्यातील सिंधी-हिंदी हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होता. २७ मार्चला सकाळी १० वाजता वडील ओमप्रकाश दूध विक्री करण्यासाठी सायकलने निघून गेले तर आईसुद्धा अकरा वाजता बाहेर पडली. त्यावेळी वंश हा घरासमोरील मनपाच्या मैदानावर एकटाच खेळत होता. तो नेहमीप्रमाणे बारा वाजता शाळेत जात होता. दुपारी साडेबारा वाजता वंशिका शाळेतून घरी आली. तिला वंशचे दप्तर घरी दिसले; पण तो दिसून आला नाही. दुपारी एक वाजता आई-वडील घरी आले. त्यावेळी त्यांनी वंश घरी नसल्यामुळे शाळेत चौकशी केली, तसेच नातेवाइकांनाही फोन करून चौकशी केली. तो मिळून येत नसल्यामुळे ओमप्रकाश आणि गौरी यांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी सात वाजतापर्यंत बगिचे, मित्रांची घरे आणि परिसर पिंजून काढल्यानंतरही मिळून न आल्याने प्रतापनगर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. 

सीसीटीव्ही फुटेजची मदत
आज गुरुवारी मृतदेह आढळताच गुन्हे शाखेचे पथक सतर्क झाले. त्यांनी परिसर पिंजून काढून सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सलग पाच तास सीसीटीव्हीचा अभ्यास केल्यानंतर आरोपींबाबत सुगावा मिळाला. मावसभावानेच वंशचा खून करून मृतदेह सोनेगाव तलावात दुचाकीवरून फेकल्याचे स्पष्ट झाले. 

असा झाला वाद
वंशच्या घरी त्याच्या मावशीच्या म्हशी आणि गाई बांधायला आहेत. शेणाच्या गोवऱ्या आणण्यासाठी वंश आणि त्याचा मावसभाऊ गेले होते. पोते पकडण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने वंशचा दोरीने गळा आवळला. यामध्ये वंशचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने गोवऱ्याच्या पोत्यात वंशचा मृतदेह भरला आणि दुचाकीवरून सोनेगाव तलावात फेकला.

सोशल मीडियाचा आधार
वंशची मिसिंग तक्रार दाखल होताच पोलिसांनी वंशची सर्व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटोसह व्हायरल केली. त्यामुळे अनेकांच्या व्हॉट्‌सॲपवर वंशचे वर्णन आणि फोटो फिरत होता. सामान्य नागरिकांनीही वंशला शोधण्यासाठी पुढाकार घेतला. परिसरातील अनेक दुकानांमध्ये वंशचे पोस्टर चिपकवलेले होते तर भाजीपाला विक्रेत्यांनीही पाम्प्लेट वाटून शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: nagpur news vansh yadav murder