तुमच्या वाहनाच्या नंबरचीही होतेय चोरी

तुमच्या वाहनाच्या नंबरचीही होतेय चोरी

नागपूर - सावधान...! तुम्ही नुसते जबाबदार वाहनचालक असणे पुरेसे नाही. तुमच्या वाहनाचा नंबर कुणाच्याही वाहनावर लागलेला असू शकतो आणि न केलेल्या गुन्ह्याबद्दल तुम्हाला पोलिसांकडून चालान पाठविले जाऊ शकते. नागपुरात एकाच क्रमांकाची अनेक वाहने फिरत असल्याचे आणि त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सर्रास फायदा उचलत असल्याचे सांगणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. 

तुमची गाडी फोर व्हीलर असली तर त्याच क्रमांकाची एखादी टू व्हीलर तुम्हाला शहरात फिरताना दिसू शकते. टू व्हीलरचा नंबर फोर व्हीलरला लावलेला दिसू शकतो. चोर सोडून संन्याशाला सुळावर चढवले जाण्यासाठी समाजकंटक प्रवृत्तींनी शोधलेला हा नवा फंडा आहे आणि निरपराधांना त्याचा फटका बसू लागला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन वेगवेगळ्या (व्हिक्‍टर, पल्सर आणि युनिकॉर्न मोटारसायकल) वाहनांची छायाचित्रे असलेले चालान नरेंद्रगनरातील एका नागरिकाला मिळाले आहेत. त्याची मूळ गाडी स्प्लेन्डर ही मोटारसायकल. या स्प्लेंडरचा नंबर उपरोक्त तिन्ही प्रकारच्या वाहनांवर लागलेला चालानमध्ये दिसतो. शिवाय, त्या गाड्यांवर बसलेले लोकही वेगवेगळे दिसतात. नरेंद्रनगरातील ताराचंद वसंतराव चरडे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला व त्यामुळे ते चक्रावून गेले आहेत. त्यांना (एकाच क्रमांकाच्या) तीन वेगवेगळ्या वाहनांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ई-चालान पाठवण्यात आले आहे. आपल्या गाडीचा चरडे यांच्याकडे एमएच ३१-डीएन ३४६७ या क्रमांकाची दुचाकी आहे. त्यांचा दिनक्रम ठरलेला असून घराजवळील काही ग्राहकांपुरतेच त्यांचे संबंध मर्यादित आहेत. मात्र, त्यांच्या दुचाकीवर असलेल्या अधिकृत क्रमांकाच्या आणखी काही दुचाकी गाड्या शहरात फिरत असल्याचा उलगडा त्यांना ई-चालानवरून झाला.

चरडे यांनी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रारच केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बाबतीत घडलेल्या (व त्यांचा संबंध नसलेल्या) तीन घटना अशा ः १) दोन महिन्यांपूर्वी दिघोरी चौकात वाहनाने नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना चालान पाठविण्यात आले आहे. या चालानमध्ये दिसणारी व्यक्ती भलतीच आणि दुचाकी युनिकॉर्नची आहे. ही माहिती त्यांनी पोलिसांना भेटून स्पष्ट केली आणि त्यांचे चालान रद्द झाले. २) दुसरे चालान दोसर भवन परिसरात वाहन चालविताना हेल्मेट घातलेले नव्हते, असा ठपका ठेवणारे होते. त्या चालानवर दिसणारी बाइक व्हिक्‍टर आहे आणि चालक वेगळाच आहे. हे चालान पाहून ते चक्रावून गेले. चालान घेऊन ते वाहतूक कार्यालयात गेले. भलत्याच दुचाकी मालकाचे चालान आपल्याला पाठविल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी फोटो तपासून पाहता नंबरप्लेटसारखीच असल्याचे सांगून चालान रद्द केले. ते गेल्या सहा महिन्यांपासून त्या परिसरात गेले नव्हते, तरी चालान कसे आले, असा प्रश्‍न त्यांना पडला.  ही सर्व प्रक्रिया पार पाडून घरी पोहचत नाहीत तोच पोस्टमन आणखी एक नवे चालान घेऊन आला. चिटणीस पार्कजवळ आढळलेल्या पल्सर दुचाकीवर चरडे यांच्या स्प्लेंडर या दुचाकीचा क्रमांक लावलेला त्यांना त्यात दिसत होता. पुन्हा त्यांनी पोलिसांना ही दुचाकी आपली नसल्याचे पटवून दिले. पोलिसांनी अशाप्रकारे तीनदा ई-चालान रद्द केले. मात्र, भविष्यातही अशा प्रकारचे अनेक चालान येतील, अशी भीती चरडे यांना वाटत आहे. आपल्या गाडीची नंबरप्लेट लावून एखाद्या वाहनाचा वापर एखाद्या गुन्ह्यात होईल आणि आपण नाहक संकटात फसू, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळची भूमिका
सामान्य नागरिकांना अशाप्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमधून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. वाहनांचे मेक त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे तपासणे आणि मगच चालान पाठविणे हा त्यावरील मार्ग आहे. यासंदर्भात आरटीओची मदत पोलिसांना घेता येईल. एखाद्याचे ई-चालान पाठविण्यापूर्वी त्याच्या गाडीवर आढळलेला क्रमांक कोणत्या मेकच्या (टू व्हीलर, फोर व्हीलर, कार, मोटारसायकल) वाहनासाठी आरटीओने दिलेला आहे व त्याची नोंदणी केलेली आहे, याची तपासणी व्हायलाच हवी. अन्यथा, उद्या गुन्हेगारी कृत्यात सामान्य नागरिकांना विनाकारण फसवले जाण्याची शक्‍यता आहे.

आयुक्‍तांकडे केली तक्रार
शहरात एकाच क्रमांकाच्या अनेक दुचाकी असल्यामुळे कुणीतरी भलतेच काम करून विनाकारण पोलिसांचा ससेमिरा लागण्याची शक्‍यता असल्याने ताराचंद चरडे यांनी पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे तक्रार केली आहे. शहरातील सारख्या दुचाकींचा शोध घेऊन गुन्हेगारी रोखावी तसेच सामान्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी विनंती त्यांनी आयुक्‍तांना केली आहे.

टोळी असण्याची शक्‍यता
शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी असून, ती चोरलेल्या दुचाकींना कुणाच्याही दुचाकींची नंबरप्लेट लावून वाहनाचा वापर करतात. तसेच नंबरप्लेट बदलून गुन्हेगारी कारवाया करतात. दुचाकी चोरल्यानंतर नंबर बदलवून दुचाकी कमी पैशात विकतात. अशाप्रकारे चोरी करणारी टोळी असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ड्रायव्हिंग लायसनसह कागदपत्रांचीही तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com