वाहनधारकांनो, सावधान! पाच महिन्यांत चोरल्या सातशे दुचाकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

चोरट्याच्या गॅंगमध्ये मेकॅनिक 
मकबुल पठाण हा दुचाकी चोरट्यांचा म्होरक्‍या आहे. त्याने दुचाकीचा मॅकेनिक असलेल्या सैयद अजीम याला गॅंगमध्ये सामील केले. अजीमला स्विच तोडून विना चावीने दुचाकी सुरू करता येत होती. त्यामुळे अजीम हा केवळ दुचाकी सुरू करून देत होता. तर अन्य जण दुचाकी चोरून नेत होते.

नागपूर - शहरात दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. आतापर्यंत पाच महिन्यांत जवळपास ७०० दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी पोलिसांत आहेत, तर गेल्या महिन्यात तब्बल ११० दुचाकी चोरी गेल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये आहे. यासोबतच लकडगंज पोलिसांनीही एका टोळीला अटक केली. त्यांच्याकडून १३ दुचाकी जप्त केल्या. यात आरोपींची संख्या आणि दुचाकींची संख्या वाढण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटक आरोपींना रविवारपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने दिली. 

शहरात दुचाकींची चोरी करणाऱ्या एक नव्हे तर अनेक टोळ्या सक्रिय आहेत. यासोबतच चोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावण्यासाठीही वेगळी व्यवस्था चोरट्यांनी केली आहे. बुधवारी लकडगंज पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली. मकबुल मुनीर खान पठाण (वय २०, रा. सिंधीबन, मोठा ताजबाग) आणि सैयद अजीम सैयद अब्दुल (वय १९, मोठा ताजबाग) अशी दुचाकी चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांनी दिली. हे दोघेही बुधवारी जुना भंडारा रोडवर एका लॉनसमोर उभे होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी दुचाकी चोरण्याच्या तयारीत उभे असल्याची कबुली दिली. त्यांनी लकडगंजमधून ३, सक्‍करदरातून, हुडकेश्‍वर, जरीपटका येथून दोन तर अन्य ठिकाणावरून प्रत्येक एक दुचाकी चोरली होती. 

चोरीसाठी ठरल्या वेळा
सकाळी सहा ते दहा मंदिर, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकावर गर्दी असते. त्यामुळे सकाळी तेथून दुचाकी चोरायचे. दुपारी मार्केट परिसर, आठवडी बाजार आणि दुकानांसमोरून दुचाकी चोरायचे तर सायंकाळी शहरातील बगिचे, वॉकिंग ट्रॅक आणि तलाव परिसरातून दुचाकी चोरी करण्याचा फंडा चोरटे वापरत होते.

Web Title: nagpur news vehicle theft crime

टॅग्स