...अन्‌ संयमाचा बांध फुटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नागपूर - वेणा जलाशयावर जलविहारासाठी गेलेल्या ११ पैकी आठ जणांचा नाव उलटून मृत्यू झाला. आठ जणांपैकी सात जणांचे मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत पाण्याबाहेर काढले. मात्र, अतुल भोयर याचा मृतदेह सापडला नव्हता. त्यामुळे अतुलची पत्नी शरयू, आई कुसुम आणि वडील धनराज यांच्या मनात आशेचा किरण होता. अतुल पाण्यात बुडालाच नसून, तो रागाच्या भरात कुठेतरी निघून गेला असावा. तो नक्‍कीच काही दिवसांनी परत येईल, अशी भाबडी आशा त्यांना होती. रविवार आणि सोमवार दोन दिवसांनंतरही अतुलचा मृतदेह न सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांमध्ये धाकधूक आणि आशाही होती.

नागपूर - वेणा जलाशयावर जलविहारासाठी गेलेल्या ११ पैकी आठ जणांचा नाव उलटून मृत्यू झाला. आठ जणांपैकी सात जणांचे मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत पाण्याबाहेर काढले. मात्र, अतुल भोयर याचा मृतदेह सापडला नव्हता. त्यामुळे अतुलची पत्नी शरयू, आई कुसुम आणि वडील धनराज यांच्या मनात आशेचा किरण होता. अतुल पाण्यात बुडालाच नसून, तो रागाच्या भरात कुठेतरी निघून गेला असावा. तो नक्‍कीच काही दिवसांनी परत येईल, अशी भाबडी आशा त्यांना होती. रविवार आणि सोमवार दोन दिवसांनंतरही अतुलचा मृतदेह न सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांमध्ये धाकधूक आणि आशाही होती. मात्र, काल सकाळी त्याचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

परिवारांनी अतुलच्या प्रतीक्षेत सोमवारची रात्र जागून काढली. तो दार ठोठावेल का? अतुलच्या गाडीचा आवाज येतोय? असे अनेक प्रश्‍न मनात घर करून होते. मात्र, मंगळवारचा दिवस उजाडला आणि अतुलचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याची माहिती पत्नी शरयूला मिळाली. त्यामुळे अक्षरशः आईवडिलांच्या सहनशक्‍तीचा आणि संयमाचा बांध फुटला. आई कुसुम या धाय मोकलून रडायला लागल्या तर वडिलांचे अवसान गळाले. पत्नी शरयूच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता तर निरागस असलेली दोन वर्षीय मुलगी स्वरा ही ‘पप्पा डॉल घेऊन येतील,’ या आशेने वाट बघत असावी. अतुल धनराज भोयर (वय ३०, गुरुकृपानगर) हा जामठा येथील माउंट फोर्ट शाळेत कॉम्प्युटर टीचर होता. दोन वर्षांची मुलगी स्वरा व आयटीआयमध्ये शिक्षिका असलेली बहीण भारती असे सुखी कुटुंब. बहिणीचे नुकतेच लग्न ठरलेले. येत्या डिसेंबर महिन्यात बहिणीचे लग्न असल्याने घरात तयारी सुरू होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना घरातील एकुलता आणि कर्ता पुरुष असलेल्या अतुलचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण घरावर मरगळ आली होती. आईच्या डोळ्यातील अश्रू खंडत नव्हते तर पत्नी शरयू जोडीदार गेल्याने भानावरही नव्हती. वडील उंबरठ्यावर कपाळाला हात लावून अतुलची वाट पाहत होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अतुलचा मृतदेह घरी आला. तासाभरातच तयारी करून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

उन्हाळ्यात लावणार होता स्विमिंग क्‍लास
अतुलला पाण्यात उतरण्याची आणि उंचीवर जाण्याची भीती वाटत होती. त्यामुळे तो केव्हाच पाण्यात उतरत नव्हता. मनातील पाण्याची भीती नष्ट व्हावी, यासाठी त्याने स्विमिंग क्‍लास लावण्याचे ठरवले होते. उन्हाळ्यात स्विमिंग टॅंकवर जाऊन तो परत आला. पाण्याची भीती मनात पुन्हा बसल्यामुळे मुलगी मोठी झाल्यानंतर पोहणे शिकण्याचा मानस त्याने पत्नी शरयूकडे बोलून दाखवला होता. मात्र काळाने घाला घातला आणि पाण्यातच अतुलचा जीव गेला. 

...तर वाचला असता जीव
अतुल घाईघाईत मित्रांच्या भेटीला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, घरी कुणी नसल्यामुळे पत्नी शरयूने नातेवाइकांकडे सोडून मागितले. पत्नीला दुचाकीने नातेवाइकाच्या घराच्या चौकात सोडले आणि पुन्हा सुसाट निघून गेला. मात्र, नातेवाईक बाहेरगावी गेल्यामुळे पत्नीने सात मिनिटांनी पुन्हा फोन केला आणि नातेवाइकाच्या घराला कुलूप असल्याचे सांगितले. त्यामुळे घेण्यासाठी परत बोलावले. मात्र, अतुल बराच दूर निघून गेला होता. तरीही पत्नीने घरी पोहाचवून देण्यासाठी विनंती केली. मात्र, अतुलने ऑटोने घरापर्यंत जाण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा मित्रांसोबत निघून गेला. जर अतुल पत्नीला घेण्यासाठी परत आला असता तर वेळ चुकून त्याचा जीव वाचला असता.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
गुरुकृपा नगरात अतुल सर्वांच्याच ओळखीचा होता. आज सकाळी अतुलचा मृतदेह आला. त्यावेळी मोठी गर्दी अंतिम दर्शनासाठी उसळली होती. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. सात जणांचे अंत्यसंस्कार सोमवारीच झाल्यामुळे अतुलच्या अंत्यसंस्कारासाठी सातही मित्रांचा परिवार उपस्थित होता. साश्रुनयनांनी अतुलच्या मित्रांनी निरोप दिला.

स्वराचा २१ ऑगस्टला वाढदिवस
स्वरा या मुलीचा दुसरा वाढदिवस उत्साहात साजरा करण्याची तयारी अतुल आणि त्याच्या परिवाराने सुरू केली होती. एकाच वर्षात बहिणीचे लग्न आणि मुलींचा वाढदिवस असे दोन आल्याने परिवार आनंदात होता. मात्र, अतुलच्या निधनामुळे परिवारातील जीवनातील आनंद हरविला.

Web Title: nagpur news Vena Dam Accident