शिष्यांनी पूर्ण केले गुरूचे अपूर्ण पुस्तक!

नितीन नायगावकर
शुक्रवार, 30 मार्च 2018

नागपूर - ज्येष्ठ कवी स्व. प्रा. कृष्णा चौधरी त्यांच्या कवितांसोबतच स्पष्टवक्‍तेपणा  आणि कठोर समीक्षेसाठी ओळखले जायचे. त्यामुळे चाहते किंवा शिष्यांना त्यांच्याशी बोलताना हजारदा विचार करावा लागायचा. प्रा. चौधरी यांच्या निवडक आवडत्या शिष्यांमध्ये प्रा. डॉ.  गिरीश सपाटे व प्रा. जगदीश गुजरकर यांचा समावेश होतो. या शिष्यांनी गुरूंचे अखेरचे पुस्तक पूर्ण करून त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

माणसाची असो वा कवीची अगदी चालतीबोलती समीक्षा करून मोकळे होणारे प्रा. कृष्णा चौधरी यांचा शुक्रवारी (ता. ३०) पहिला स्मृतिदिन. मृत्यूपूर्वी काही वर्षे ते फार मोजक्‍या लोकांच्या संपर्कात होते. अगदी दोन-तीन लोकांच्या म्हटले तरी चालेल. आयुष्यभर आपल्या तत्त्वांवर ठाम राहिलेले प्रा. चौधरी यांचे शिष्यही तसे आपल्या गुरूंच्या बाबतीत चिवटच. कित्येक वर्षे ‘चौधरी सर’ हा एकच विषय त्यांच्या चर्चेला आणि अभ्यासाला आला, आजही येतोय.

प्रा. डॉ. गिरीश सपाटे व प्रा. जगदीश गुजरकर हे चौधरी सरांचे सर्वाधिक लाडके शिष्य. मृत्यूच्या दोन वर्षांपासून प्रा. चौधरी यांचे ‘संत साहित्यातील सौंदर्यसंबोध’ हे पुस्तक प्रकाशनाच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी जगाचा निरोप घेईपर्यंत पुस्तक प्रकाशित होऊ शकले नाही. गेल्यावर्षी प्रा. कृष्णा चौधरी यांच्या अंत्यसंस्काराला शिष्यांनी प्रथम स्मृतिदिनापर्यंत पुस्तक पूर्ण करण्याचा संकल्प सोडला. वर्षभरात पुस्तकाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण केले आणि त्याचे प्रकाशन शुक्रवारी होऊ घातले आहे.

चौधरी सरांचे अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी सर्वांत पहिले गिरीश गांधी यांनी आम्हाला प्रेरणा दिली. त्यानंतर अनेकांचे हातभार लागले. आपल्या गुरूंना साहित्यरूपी श्रद्धांजली अर्पण करताना आम्हा शिष्यांना गहिवरून येत आहे. - प्रा. डॉ. गिरीश सपाटे

‘संत साहित्यातील सौंदर्य संबोध’चे आज प्रकाशन
विदर्भ साहित्य संघाच्या वरूड शाखेतर्फे श्रीमती जानकीदेवी गांधी कन्या विद्यालयाच्या सभागृहात प्रा. कृष्णा चौधरी यांच्या ‘संत साहित्यातील सौंदर्य संबोध’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडेल. उषाताई चौधरी, पुस्तकाचे संपादक प्रा. डॉ. गिरीश सपाटे आणि प्रा. जगदीश गुजरकर, श्रीराम आष्टनकर, पवन कामडी आदींची उपस्थिती असेल. प्रा. टी. व्ही. वऱ्हेकर, प्रा. गंगाधर दवंडे यांनी हे आयोजन केले आहे.

Web Title: nagpur news Veteran poet Krishna Chaudhary